धोक्याची घंटा! महाबळेश्वर–प्रतापगड मार्गावरील आंबेनळी घाटात छोटे जननी माता मंदिराशेजारी रस्ता खचण्याच्या उंबरठ्यावर; प्रशासनाच्या तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी
धोक्याची घंटा! महाबळेश्वर–प्रतापगड मार्गावरील आंबेनळी घाटात छोटे जननी माता मंदिराशेजारी रस्ता खचण्याच्या उंबरठ्यावर; प्रशासनाच्या तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी
प्रतापगड प्रतिनिधी :
महाबळेश्वर–प्रतापगड या महत्त्वाच्या पर्यटन व दळणवळणाच्या मार्गावरील आंबेनळी घाटात हरोशी गावाच्या वरच्या बाजूस असलेल्या छोटे जननी माता मंदिराशेजारी रस्ता खचण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या खालच्या बाजूचा मोठा भाग दरडीसह कोसळला असून संरक्षक कठडेही पूर्णपणे तुटून खाली कोसळले आहेत. त्यामुळे या ठिकाणी रस्त्याचा पाया कमकुवत झाला असून कोणत्याही क्षणी रस्त्याचा आणखी भाग खचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या या मार्गावरून वाहतूक सुरू असली तरी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर माती वाहून गेल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः घाटातील वळणाचा हा भाग असल्याने पावसामुळे दृश्यमानताही कमी होत असून अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. रस्त्याच्या कडेला उभे असलेले संरक्षक कठडे दरडीसह कोसळल्याने सुरक्षिततेची यंत्रणाच नाहीशी झाली आहे.
महाबळेश्वर–प्रतापगड मार्ग हा पर्यटक, स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. पावसाळ्यात या मार्गावर पर्यटकांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत रस्ता खचण्याच्या धोक्याकडे दुर्लक्ष झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी या ठिकाणी तातडीने तांत्रिक पाहणी करून रस्त्याची मजबुतीकरणाची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत असून रस्त्याखालची माती वाहून जात आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास संपूर्ण रस्ताच कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी तात्काळ संरक्षक भिंत उभारणे, रस्त्याच्या कडेला नवीन सुरक्षा कठडे बसविणे, इशारा फलक लावणे तसेच आवश्यकतेनुसार वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासनाने या धोकादायक ठिकाणी सातत्याने पाहणी करून परिस्थितीवर लक्ष ठेवावे आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि पर्यटकांकडून करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment