आंबेनळी घाट धोक्याच्या छायेत; संरक्षक कठड्यांच्या अभावामुळे जीव मुठीत धरून प्रवासदरडी, मातीचा ओसरा, खोल दऱ्या आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था; मोठी दुर्घटना होण्याची प्रशासन वाट पाहतेय का?
आंबेनळी घाट धोक्याच्या छायेत; संरक्षक कठड्यांच्या अभावामुळे जीव मुठीत धरून प्रवास
दरडी, मातीचा ओसरा, खोल दऱ्या आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था; मोठी दुर्घटना होण्याची प्रशासन वाट पाहतेय का?
पोलादपूर | प्रतिनिधी
आंबेनळी घाट परिसरात पावसाळ्याची सुरुवात होताच धोक्याची घंटा पुन्हा एकदा वाजू लागली आहे. पोलादपूर–वाई–महाबळेश्वर–सुरूर राज्य मार्गावरील या घाटात एका बाजूला सातत्याने दरडी कोसळणे, मातीचा ओसरा होणे आणि झाडे रस्त्यावर पडण्याच्या घटना घडत असताना दुसऱ्या बाजूला अनेक अतिधोकादायक वळणांवर आजही संरक्षक कठडे नसल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वारंवार घडणाऱ्या घटनांनंतरही आवश्यक सुरक्षा उपाययोजना रखडल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
बावली टोक ते दाभील टोक या दरम्यान घाटालगत शेकडो फूट खोल दऱ्या असून अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला कोणतीही प्रभावी संरक्षण व्यवस्था नाही. या परिसरात यापूर्वी अनेक गंभीर अपघात घडले असून, विशेषतः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या बसचा दरीत कोसळून झालेला भीषण अपघात आजही नागरिकांच्या स्मरणात आहे. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी सातारा येथील युवकांच्या वाहनाचा अपघात होऊन आठ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. मात्र, त्या दुर्घटनास्थळांसह अनेक धोकादायक वळणांवर अद्याप मजबूत संरक्षक कठडे अथवा बॅरिकेड्स उभारण्यात आलेले नाहीत. त्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी, धुक्यात किंवा मुसळधार पावसात वाहनचालकांसाठी ही परिस्थिती अधिकच धोकादायक ठरत आहे.
सध्या घाट परिसरात रस्ता रुंदीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असून यासाठी अनेक ठिकाणी डोंगर कापण्यात आले आहेत. परिणामी डोंगराचा भाग सैल झाला असून यंदाच्या पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका अधिक वाढल्याचे जाणकारांचे मत आहे. काही ठिकाणी पाण्याच्या निचऱ्यासाठी गटारे खोदण्यात आली असली तरी डोंगराच्या बाजूने आवश्यक भराव व मजबुतीकरणाचे काम न झाल्यामुळे पावसाचे पाणी थेट उतारावरून वाहत आहे. त्यामुळे मातीचा ओसरा वाढून भविष्यात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरड कोसळल्यानंतर संबंधित ठेकेदारांकडून जेसीबीच्या साहाय्याने रस्ता तातडीने मोकळा केला जातो. मात्र, दरड कोसळल्यानंतरची कारवाई महत्त्वाची की दरड कोसळूच नये यासाठी आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. मध्यरात्री किंवा पहाटे अचानक एखाद्या वाहनावर दरड कोसळल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.
चिरेखंड येथील राखीचा टोक परिसरातील ओव्हाळाजवळ पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी आवश्यक असलेले पाईप अद्याप टाकण्यात आलेले नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. याच मार्गाने प्राथमिक शाळेतील विद्यार्थी दररोज ये-जा करत असून गेल्या वर्षी पाण्याच्या प्रवाहात एक विद्यार्थी वाहून जाता जाता बचावल्याची घटना घडली होती. याबाबत वारंवार सूचना देऊनही संबंधित ठेकेदाराने आवश्यक उपाययोजना न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे यंदा एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणावर निश्चित होणार, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
दरडी, खोल दऱ्या, संरक्षक कठड्यांचा अभाव आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे आंबेनळी घाटातील प्रत्येक प्रवास धोकादायक ठरत आहे. त्यामुळे पोलादपूर आपत्ती व्यवस्थापन समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार यांनी संयुक्त पाहणी करून धोकादायक ठिकाणी तातडीने संरक्षक कठडे, बॅरिकेड्स, इशारा फलक, पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था तसेच चोवीस तास कार्यरत आपत्कालीन यंत्रणा उभारण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
मोठी दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा ती होण्यापूर्वीच प्रशासनाने जागे होऊन प्रभावी पावले उचलण्याची गरज असल्याची भावना आता सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्रतेने व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment