महाबळेश्वरच्या इनर व्हील क्लबचा जिल्हास्तरावर गौरव; सेवाभावी कार्यासाठी मानाचे पुरस्कार, ८५ हून अधिक सामाजिक उपक्रमांची दखल
महाबळेश्वरच्या इनर व्हील क्लबचा जिल्हास्तरावर गौरव; सेवाभावी कार्यासाठी मानाचे पुरस्कार, ८५ हून अधिक सामाजिक उपक्रमांची दखल
महाबळेश्वर, प्रतिनिधी :
सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने सेवाभावी उपक्रम राबवणाऱ्या इनर व्हील क्लब ऑफ महाबळेश्वरने सन २०२५–२६ या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे जिल्हास्तरावर मानाचा बहुमान मिळविला आहे. इनर व्हील डिस्ट्रिक्ट ३१३च्या वतीने आयोजित गौरव सोहळ्यात क्लब तसेच पदाधिकाऱ्यांना विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. हा गौरव डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉ. आशा देशपांडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यात क्लबच्या अध्यक्षा वर्षा संतोष पार्टे आणि सचिव सपना राजीव अरोरा यांच्या नेतृत्वाची विशेष दखल घेत 'मानाचा सुवर्ण उत्कृष्ट अध्यक्षा–सचिव जोडी पुरस्कार' (स्टार गोल्डन बेस्ट प्रेसिडेंट–सेक्रेटरी पेअर अवॉर्ड – जोडी क्रमांक १) प्रदान करण्यात आला. तसेच अध्यक्षा वर्षा पार्टे यांना उत्कृष्ट नेतृत्व, नियोजन आणि सेवाभावी कार्यासाठी 'महाबळेश्वर उत्कृष्ट अध्यक्षा – उल्लेखनीय कार्य पुरस्कार' (महाबळेश्वर स्टार प्रेसिडेंट – इनक्रेडिबल वर्क अवॉर्ड) देऊन गौरविण्यात आले.
क्लबच्या खजिनदार अदिती भांगडिया यांनीही आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवत 'उत्कृष्ट खजिनदार पुरस्कार' (स्टार ट्रेझरर अवॉर्ड) या गटात जिल्हास्तरावर पाचवा क्रमांक पटकावला. आर्थिक व्यवहारातील पारदर्शकता, काटेकोर नियोजन आणि जबाबदारीने केलेल्या कामकाजाची ही पावती असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
क्लबने वर्षभरात बालहक्क संरक्षण, महिला सक्षमीकरण, ज्येष्ठ नागरिक कल्याण, युवा विकास, पर्यावरण संरक्षण, कुटुंब कल्याण तसेच इनर व्हीलच्या सेवाकार्याचा प्रसार अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली. या कार्याची दखल घेत क्लबला उत्कृष्टता प्रमाणपत्रे (सर्टिफिकेट्स ऑफ एक्सलन्स) प्रदान करण्यात आली. तसेच 'हॅपी स्कूल' या शैक्षणिक उपक्रमांतर्गत केलेल्या प्रभावी कामगिरीबद्दल क्लबला तीन सुवर्णपदकांनी गौरविण्यात आले.
अध्यक्षा वर्षा पार्टे यांच्या नेतृत्वाखाली २०२५–२६ या कार्यकाळात क्लबने ८५ हून अधिक समाजोपयोगी प्रकल्प यशस्वीपणे राबविले. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, सामाजिक जनजागृती, गरजू कुटुंबांना मदत, विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान तसेच समाजहिताच्या अनेक सेवाभावी कार्यक्रमांद्वारे क्लबने महाबळेश्वर परिसरात आपला वेगळा ठसा उमटविला.
याप्रसंगी भावना व्यक्त करताना अध्यक्षा वर्षा संतोष पार्टे म्हणाल्या, "हा सन्मान केवळ माझा किंवा पदाधिकाऱ्यांचा नसून इनर व्हील क्लब ऑफ महाबळेश्वरच्या प्रत्येक सदस्याचा आहे. सर्व सदस्यांचे समर्पण, एकजूट आणि सातत्यपूर्ण सेवाभाव यामुळेच हा बहुमान मिळाला. आम्ही एकत्रितपणे सेवा केली, एकत्रितपणे यश मिळवले आणि एकत्रितपणे इतिहास घडवला."
महाबळेश्वरच्या इनर व्हील क्लबला मिळालेला हा जिल्हास्तरीय सन्मान त्यांच्या सेवाभावी कार्याची पावती मानला जात असून, त्यामुळे क्लबच्या पुढील सामाजिक उपक्रमांना निश्चितच नवी ऊर्जा मिळणार आहे. तसेच हा गौरव महाबळेश्वर परिसरातील इतर सामाजिक संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरत असून, समाजसेवेच्या क्षेत्रात अधिक व्यापक काम करण्यासाठी प्रोत्साहन देणारा ठरला आहे.
Comments
Post a Comment