वेण्णा नदीला दिला नवा श्वास! रुंदीकरण व खोलीकरणाचे काम विक्रमी १० दिवसांत पूर्ण; पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात महाबळेश्वर पालिकेला मोठे यश
वेण्णा नदीला दिला नवा श्वास! रुंदीकरण व खोलीकरणाचे काम विक्रमी १० दिवसांत पूर्ण; पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात महाबळेश्वर पालिकेला मोठे यश
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर शहराला दरवर्षी पावसाळ्यात भेडसावणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने महाबळेश्वर नगरपरिषद प्रशासनाने हाती घेतलेल्या वेण्णा नदीच्या रुंदीकरण व खोलीकरणाच्या कामाला मोठे यश मिळाले आहे. नगराध्यक्ष सुनील शिंदे, स्थानिक नगरसेवक आणि मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या विशेष पुढाकारातून वेण्णा नदी पात्रातील गाळ काढण्याचे काम अवघ्या दहा दिवसांत पूर्ण करण्यात आले असून, त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे दिसून येत आहे.
महाबळेश्वर शहरातून वाहणाऱ्या वेण्णा नदीच्या पात्रात गेल्या अनेक वर्षांत मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. परिणामी नदीची खोली कमी झाली होती आणि पाणी वहन क्षमताही घटली होती. मुसळधार पाऊस झाल्यानंतर नदीचे पाणी पात्राबाहेर येऊन नदीकाठच्या घरांमध्ये, व्यावसायिक आस्थापनांमध्ये तसेच रस्त्यांवर शिरत असे. त्यामुळे नागरिकांना दरवर्षी आर्थिक नुकसानासह मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता.
ही गंभीर समस्या लक्षात घेऊन नगरपरिषद प्रशासनाने तातडीने नियोजन करत नदीपात्रातील गाळ उपसण्याचा निर्णय घेतला. यासाठी दोन मोठ्या पोकलेन यंत्रांच्या साहाय्याने युद्धपातळीवर काम हाती घेण्यात आले. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने नदीपात्रातील मोठ्या प्रमाणावरील गाळ काढून नदीची खोली वाढविण्यात आली, तसेच आवश्यक त्या ठिकाणी नदीचे पात्र रुंद करण्यात आले. त्यामुळे वेण्णा नदीची पाणी वहन क्षमता लक्षणीयरीत्या वाढली आहे.
या कामाचा सकारात्मक परिणाम यंदाच्या मुसळधार पावसात दिसून आला. नदीतील पाण्याचा प्रवाह सुरळीत राहिल्याने पाणी जलदगतीने पुढे वाहू लागले आणि नदीकाठच्या परिसरात पूर्वीप्रमाणे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली नाही. त्यामुळे अनेक नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या महत्त्वाकांक्षी कामामुळे शहराच्या पूरनियंत्रण व्यवस्थेला मोठी मदत झाली असून, नागरिकांनी नगराध्यक्ष सुनील शिंदे, स्थानिक नगरसेवक, मुख्याधिकारी योगेश पाटील तसेच नगरपरिषद प्रशासनाचे कौतुक करत आभार व्यक्त केले आहेत. वेण्णा नदीच्या संवर्धनाबरोबरच शहराच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारच्या विकासकामांना पुढेही प्राधान्य दिले जाईल, अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment