उपसभापती संजय मोरे यांच्या आदेशानंतर प्रशासनाची तातडीची हालचाल; कांदाटी खोऱ्यात नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू
उपसभापती संजय मोरे यांच्या आदेशानंतर प्रशासनाची तातडीची हालचाल; कांदाटी खोऱ्यात नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू
प्रतापगड प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये घरे, शेतीपिके आणि अन्य मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर माननीय उपसभापती संजय मोरे यांच्या निर्देशानुसार महसूल प्रशासनाने तातडीने हालचाल करत नुकसानग्रस्त भागांमध्ये पंचनाम्याचे काम सुरू केले आहे.
कांदाट, सालोशी, उचाट तसेच परिसरातील इतर गावांमध्ये महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी
देऊन नागरिकांच्या घरांचे, शेतीचे व इतर नुकसानीचे पंचनामे केले. या प्रक्रियेमुळे नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत व नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या पंचनामा मोहिमेत महसूल अधिकारी सावंत, उचाट ग्रामपंचायतीच्या सरपंच स्वाती रवींद्र ढेबे, सालोशीच्या सरपंच नंदा चव्हाण, तसेच अविनाश मोरे, रवी ढेबे, अण्णा आणि इतर स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेत प्रशासनाला सहकार्य केले.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनासमोर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती मांडत शासनाकडून तातडीने नुकसानभरपाई जाहीर करण्याची मागणी केली. शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, नुकसानग्रस्त कुटुंबांना त्वरित मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी उपसभापती संजय मोरे यांनी प्रशासनाला कोणत्याही पात्र नुकसानग्रस्त नागरिकावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले. तसेच पंचनाम्याचे काम पारदर्शक व वेगाने पूर्ण करून शासनाकडे अहवाल सादर करण्यावर भर देण्यात आला आहे.
अतिवृष्टीच्या संकटात स्थानिक लोकप्रतिनिधी, महसूल प्रशासन आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने काम सुरू केल्यामुळे नुकसानग्रस्त नागरिकांना लवकर मदत मिळेल, अशी आशा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment