पालिकेपासून ग्रामपातळीपर्यंत अलर्ट! मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाईंचे प्रशासनाला कडक निर्देश; जीवितहानी टाळण्यास सर्वोच्च प्राधान्य
पालिकेपासून ग्रामपातळीपर्यंत अलर्ट! मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाईंचे प्रशासनाला कडक निर्देश; जीवितहानी टाळण्यास सर्वोच्च प्राधान्य
सातारा प्रतिनिधी :
राज्यात विविध भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांनी अत्यंत सतर्क राहून काम करावे, कोणत्याही परिस्थितीत नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ देऊ नये आणि आवश्यकतेनुसार संवेदनशील भागातील नागरिकांचे तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे स्पष्ट निर्देश सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीची परिस्थिती आणि हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा आढावा घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभय काटकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पालकमंत्री देसाई यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करत २४ तास कार्यरत राहण्यासाठी संपर्क व्यवस्था सक्षम ठेवण्याचे निर्देश दिले. जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाने नागरिकांशी सातत्याने संवाद साधून भीतीचे वातावरण निर्माण होऊ देऊ नये, तसेच मदतकार्याची पथके तयार करून संवेदनशील भागात नियमित पाहणी करावी, असेही त्यांनी सांगितले.
महाबळेश्वरसह पाटण तालुक्यातील हेळवाक, नवाजा, कोयनानगर, आटोली, बामणेवाडी आणि इतर डोंगराळ भागांमध्ये मुसळधार पावसामुळे दरडी कोसळणे, घरांमध्ये पाणी शिरणे आणि भिंती पडण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे दरडप्रवण भागातील नागरिकांना वेळेत सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी आवश्यक व्यवस्था उभी करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच कोयना वसाहतीतील जलसंपदा विभागाच्या शासकीय निवासस्थानांची स्वच्छता व दुरुस्ती करून ती स्थलांतरासाठी सज्ज ठेवण्यासही सांगण्यात आले.
जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असल्याने प्रशासनाने विशेष दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले. सडावाघापूरचा उलटा धबधबा, ओझर्डे, लिंगमळा, ठोसेघर तसेच महाबळेश्वरमधील एलिफंट पॉईंट आणि आर्थर सीट पॉईंट परिसरात पावसामुळे चिखल व निसरडेपणा वाढत असल्याने पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि खोल पाण्यात कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी होणार नाही यासाठी आवश्यक आदेश जारी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
मुसळधार पावसामुळे रस्ते खचणे, दरडी कोसळणे आणि वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबी ऑपरेटरची संपर्क यादी अद्ययावत ठेवावी, शाखा अभियंते व सरपंचांना ती उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश देण्यात आले. महावितरणने नादुरुस्त विद्युत तारा, खांब आणि डीपीची तातडीने दुरुस्ती करून अखंडित वीजपुरवठा राखण्याचे आदेश देण्यात आले. आरोग्य विभागाने ग्रामीण भागात औषधसाठा उपलब्ध ठेवण्याबरोबरच रुग्णवाहिका सज्ज ठेवाव्यात आणि सर्पदंशावरील लसींचीही उपलब्धता सुनिश्चित करावी, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्राथमिक नुकसानीचा आढावा सादर करत महाबळेश्वर तालुक्यातील ११ आणि वाई तालुक्यातील १७ नागरिकांचे सुरक्षितस्थळी नातेवाईकांकडे स्थलांतर करण्यात आल्याची माहिती दिली. पाटण, सातारा आणि खंडाळा तालुक्यात २४ घरांची पडझड झाली असून ताथवडे घाटात दगड गाडीवर कोसळल्याने फलटण तालुक्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच खंडाळा तालुक्यात दोन शेळ्यांचा मृत्यू झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
संभाव्य अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफचे पथक कराड येथे तैनात करण्यात आले असून पश्चिम घाटातील पाच तालुक्यांतील तहसीलदारांसह सर्व यंत्रणा प्रत्यक्ष फिल्डवर कार्यरत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. दरडप्रवण भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव सातारा, पाटण, महाबळेश्वर, वाई आणि जावली या पाच तालुक्यांतील सर्व शाळांना ६ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment