प्रतापगडावर उभारले जाणार वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक; संयुक्त मंत्रिस्तरीय बैठकीत ऐतिहासिक निर्णय
प्रतापगडावर उभारले जाणार वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक; संयुक्त मंत्रिस्तरीय बैठकीत ऐतिहासिक निर्णय
प्रतापगड प्रतिनिधी :
स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे शूर अंगरक्षक आणि अफजलखान वध या इतिहासप्रसिद्ध प्रसंगात आपल्या अतुलनीय शौर्याने स्वराज्याचे रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांच्या शौर्यगाथेला कायमस्वरूपी अभिवादन करण्याच्या उद्देशाने किल्ले प्रतापगड येथे त्यांचा पूर्णाकृती पुतळा आणि भव्य स्मारक उभारण्यास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली विधानभवनात झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून प्रस्ताव तातडीने अंतिम करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, प्रतापगड परिसरातील पर्यटन विकास, स्मारकाची संकल्पना, जागेची निश्चिती, निधीची उपलब्धता आणि विविध प्रशासकीय मान्यतांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्राच्या इतिहासातील वीर योद्ध्यांच्या पराक्रमाचे जतन करताना पर्यटनालाही चालना मिळावी, या उद्देशाने संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे निर्देश दोन्ही मंत्र्यांनी दिले.
बैठकीस पर्यटन संचालनालयाचे संचालक मंगेश जोशी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सदस्य सचिव विजय पोवार, पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे संतोष पाटील यांच्यासह वन विभाग, जलसंपदा विभाग आणि इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, पर्यटन विभागाच्या ६ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार प्रतापगडाच्या पायथ्याशी ‘छत्रपती शिवाजी महाराज सृष्टी’ हा महत्त्वाकांक्षी पर्यटन विकास प्रकल्प राबविण्यात येत असून, या प्रकल्पासाठी सुमारे १० कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये शिवकालीन इतिहासाचे दर्शन घडविणारी शिल्पे, अॅम्फीथिएटर, लाईट अँड साऊंड शो, पर्यटक सुविधा केंद्र, कॅफेटेरिया, प्रदर्शन दालन तसेच सुशोभीकरणाची विविध कामे प्रस्तावित आहेत.
बैठकीदरम्यान वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकाबाबत यापूर्वी झालेल्या पत्रव्यवहाराचा आणि प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला. त्यांच्या ऐतिहासिक योगदानाचे महत्त्व लक्षात घेऊन प्रतापगडावर पूर्णाकृती पुतळा आणि स्वतंत्र स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. स्मारकासाठी आवश्यक जागा निश्चित करून प्रस्ताव अंतिम करण्याबरोबरच निधी उपलब्ध करून काम तातडीने सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, स्वराज्य निर्मितीत मोलाचे योगदान देणाऱ्या वीर जिवाजी महाले यांच्या शौर्याचा गौरव करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. प्रतापगडावरील हे स्मारक भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल आणि इतिहास जिवंत ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करेल. प्रतापगड हा महाराष्ट्रातील ऐतिहासिक पर्यटनाचा प्रमुख केंद्रबिंदू असून, जिवाजी महाले यांचे स्मारक उभारल्याने पर्यटकांना स्वराज्याच्या इतिहासाची अधिक प्रभावी माहिती मिळेल. त्यामुळे ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक विकासालाही गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, बैठकीत जावली तालुक्यातील मुनावळे येथे उभारण्यात येत असलेल्या जागतिक दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पाचाही आढावा घेण्यात आला. कोयना जलाशय परिसरात विकसित होत असलेल्या या प्रकल्पातील सर्व प्रलंबित कामांना तात्काळ गती देऊन ती नियोजित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.
या प्रकल्पांतर्गत मरीना, जेट स्की पार्किंग जेट्टी, अॅल्युमिनियम रॅम्प, लेक क्रूझिंग बोट, अल्ट्रा लक्झरी हाऊसबोट, सोलर इलेक्ट्रिक क्रूझिंग बोट्स, मल्टीहुल एफआरपी पॅसेंजर बोट, सी ब्रीचर, जेट बोट, फ्लाईंग बोट, कॅटामरान सेलिंग बोट, पॅरासेलिंग बोट, जेट स्की आणि जेटोव्हेटरसह विविध जलक्रीडा सुविधांचा समावेश आहे. ज्या उपकरणांचा पुरवठा झाला आहे ती तातडीने कार्यान्वित करण्याचे आणि निविदा प्रक्रियेत असलेली कामे निश्चित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी, महावितरणकडून वीजपुरवठा, वन विभागाची ना हरकत, जलसंपदा विभागाशी संबंधित बाबी, सुरक्षा व्यवस्थेसाठी आवश्यक यंत्रणा आणि बोट क्लब संचालनासाठी आवश्यक सुविधांचाही आढावा बैठकीत घेण्यात आला.
वीर जिवाजी महाले स्मारक आणि मुनावळे जलपर्यटन प्रकल्प हे दोन्ही उपक्रम सातारा जिल्ह्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटन विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
Comments
Post a Comment