दहा वर्षांपासून रस्त्याची प्रतीक्षा; दाभे-दाभेकर गावांचा अंतर्गत मार्ग दयनीय अवस्थेत, नागरिकांचा संताप
दहा वर्षांपासून रस्त्याची प्रतीक्षा; दाभे-दाभेकर गावांचा अंतर्गत मार्ग दयनीय अवस्थेत, नागरिकांचा संताप
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यातील दाभे दाभेकर या दुर्गम गावांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून गेल्या दहा वर्षांपासून या रस्त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर मात्र रस्त्याच्या दुरुस्ती किंवा देखभालीकडे कोणत्याही यंत्रणेने लक्ष न दिल्याने आज हा रस्ता खड्डेमय आणि धोकादायक बनला आहे.
दाभे दाभेकर गावातील नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी तसेच विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. तसेच वयोवृद्ध नागरिक, महिला आणि रुग्णांनाही या रस्त्यावरूनच प्रवास करावा लागत असल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांसाठी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता वाहनचालकांना मोठी कसरत करत प्रवास करावा लागत असून अनेक वेळा दुचाकी घसरून किरकोळ अपघाताच्या घटनाही घडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दुर्गम भागातील या गावांचा विकास आणि संपर्क व्यवस्था या रस्त्यावर अवलंबून असताना प्रशासनाकडून मात्र सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
गावातील नागरिक सतीश जाधव यांनी सांगितले की, "रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या, निवेदने देण्यात आली, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. प्रत्येक पावसाळ्यात रस्त्याची अवस्था अधिकच खराब होत असून नागरिकांचे हाल वाढत आहेत."
दाभे दाभेकर गावातील ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने या रस्त्याची पाहणी करून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा आणि रस्त्याचे काम त्वरित हाती घ्यावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांकडून देण्यात येत आहे.
Comments
Post a Comment