रुग्णांशी उर्मट वर्तणुकीच्या तक्रारीवर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आक्रमक; ग्रामीण रुग्णालयात निवेदन, चौकशीचे डॉ. पंडितराव देशमुख यांचे आश्वासन
रुग्णांशी उर्मट वर्तणुकीच्या तक्रारीवर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आक्रमक; ग्रामीण रुग्णालयात निवेदन, चौकशीचे डॉ. पंडितराव देशमुख यांचे आश्वासन
महाबळेश्वर, प्रतिनिधी :
महाबळेश्वर येथील मोरारजी गोकुळदास ग्रामीण रुग्णालयात एका रुग्णाशी डॉक्टरांकडून कथित उर्मट व अयोग्य वर्तणूक झाल्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेत शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, महाबळेश्वर यांच्या शिष्टमंडळाने रुग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंडितराव देशमुख यांची भेट घेत सविस्तर निवेदन सादर केले.
शिष्टमंडळाने सांगितले की, डॉ. प्रकाश खडसरे यांनी एका रुग्णाशी अपमानास्पद व अयोग्य वर्तन केल्याची तक्रार त्यांच्या निदर्शनास आली आहे. उपचारासाठी सरकारी रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सन्मानाची, संवेदनशील आणि मानवतावादी वागणूक मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये आरोग्य यंत्रणेप्रती नाराजी निर्माण होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
यावेळी शिष्टमंडळाने सर्वसामान्य नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, रुग्णांची कामे विनाकारण प्रलंबित राहू नयेत तसेच ग्रामीण रुग्णालयातील सेवा अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि जबाबदार पद्धतीने दिली जावी, अशी मागणी केली.
तक्रारीची दखल घेत वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंडितराव देशमुख यांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती पडताळली जाईल. चौकशीत संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळल्यास नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, "रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा" या भावनेतून संस्था सर्वसामान्य रुग्णांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने कार्यरत राहणार असल्याचे स्पष्ट केले. कोणताही राजकीय दिखावा न करता नागरिकांचे प्रश्न सोडविणे हेच आपले ध्येय असून, भविष्यातही रुग्णांना न्याय मिळवून देण्यासाठी वैद्यकीय मदत कक्ष कटिबद्ध राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सरकारी आरोग्य संस्थांबाबत नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णांशी सन्मानपूर्वक, संयमाने आणि संवेदनशीलतेने वागणे आवश्यक असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
Comments
Post a Comment