तीन वर्षांतही अपूर्ण पुलाचे काम; मुसळधार पावसात मोरे कळमगाव बाजूचा भाग खचला, प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात ग्रामस्थांचा संताप
तीन वर्षांतही अपूर्ण पुलाचे काम; मुसळधार पावसात मोरे कळमगाव बाजूचा भाग खचला, प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात ग्रामस्थांचा संताप
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यातील कळमगाव आणि मोरे कळमगाव या दोन गावांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या पुलाची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी या पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, सुरुवातीपासूनच पुलाच्या कामाबाबत अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाकडे वारंवार केल्या. तरीही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप आता ग्रामस्थांकडून केला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या पुलाच्या मोरे कळमगाव बाजूचा भाग मोठ्या प्रमाणात खचला आहे. त्यामुळे पुलावरून वाहने नेणे धोकादायक बनले असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक तसेच दैनंदिन कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पुलाच्या बांधकामादरम्यानच कामाच्या गुणवत्तेबाबत अनेक वेळा संबंधित ठेकेदाराकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, त्याची दखल न घेता काम पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले. आता पावसामुळे पुलाचा भाग खचल्याने त्या तक्रारी खऱ्या ठरल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
कळमगाव आणि मोरे कळमगाव ग्रामपंचायतींसह ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने पुलाची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. संभाव्य मोठी दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित विभागाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी दोन्ही ग्रामपंचायतींची एकमुखी भूमिका आहे.
दरम्यान, या गंभीर समस्येकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. पुलाचा खचलेला भाग तातडीने दुरुस्त करून सुरक्षित वाहतूक सुरू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
Comments
Post a Comment