नरवीर तानाजींच्या जन्मभूमीत पुन्हा भूस्खलनाचा धोका! गोडवलीतील शेतजमीन खचली; १०० फूट लांबीच्या भेगांनी ग्रामस्थांमध्ये भीती
नरवीर तानाजींच्या जन्मभूमीत पुन्हा भूस्खलनाचा धोका! गोडवलीतील शेतजमीन खचली; १०० फूट लांबीच्या भेगांनी ग्रामस्थांमध्ये भीती
तपनेश्वर मंदिरालगतची जमीन पुन्हा खचली; १२–१३ वर्षांपासूनची समस्या कायम, भूवैज्ञानिकांकडून अभ्यास करून कायमस्वरूपी उपाययोजनेची ग्रामस्थांची मागणी
पाचगणी / महाबळेश्वर | प्रतिनिधी
पाचगणी आणि परिसरात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार व मुसळधार पावसाने पुन्हा एकदा उग्र रूप धारण केले असून, त्याचे गंभीर परिणाम आता डोंगराळ भागात दिसू लागले आहेत. पाचगणी शहरालगत आणि नरवीर तानाजी मालुसरे यांची ऐतिहासिक जन्मभूमी म्हणून ओळख असलेल्या गोडवली (ता. महाबळेश्वर) येथे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावातील प्रसिद्ध तपनेश्वर मंदिरालगत असलेली शेतजमीन अचानक मोठ्या प्रमाणात खचली असून, जमिनीत सुमारे १०० फूट लांबीच्या आणि तीन ते चार फूट खोल भेगा पडल्या आहेत. कालपासून पावसाचा जोर वाढल्यानंतर ही घटना घडली. त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.
गोडवली हे टेबल लँडच्या पायथ्याशी वसलेले निसर्गरम्य गाव आहे. डोंगरउतार आणि अतिवृष्टीमुळे येथील मातीची धूप आणि भूस्खलनाचा धोका नेहमीच कायम असतो. मात्र तपनेश्वर मंदिरालगतच्या भागात भूस्खलन होण्याची ही पहिली घटना नाही. सुमारे १२ ते १३ वर्षांपूर्वी याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमीन खचली होती. त्यानंतरही दोन ते तीन वेळा याच परिसरात भूस्खलन झाले आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक घटनेनंतर महसूल प्रशासन आणि संबंधित विभागातील अधिकारी घटनास्थळी भेट देऊन पंचनामे व पाहणी करतात. मात्र, या समस्येच्या मूळ कारणांचा वैज्ञानिक अभ्यास करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे दरवर्षी पावसाळा सुरू झाला की या भागातील नागरिकांना भीतीच्या छायेखाली दिवस काढावे लागतात.
या भूस्खलनात स्थानिक शेतकरी सतीश रघुनाथ गुरव यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुपीक जमीन खचल्यामुळे शेतीचे स्वरूप बदलले असून, अनेक ठिकाणी खोल भेगा पडल्याने शेती करणेही धोकादायक बनले आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे उर्वरित जमीनही खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही आजपर्यंत भूवैज्ञानिक (जिऑलॉजिस्ट) यांच्या माध्यमातून या परिसराचा सखोल अभ्यास करण्यात आलेला नाही, अशी खंत व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांकडून भूगर्भीय सर्वेक्षण करून भूस्खलनाची नेमकी कारणे शोधणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी दीर्घकालीन आराखडा तयार करणे अत्यावश्यक असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकरी सतीश गुरव यांना तातडीने आर्थिक मदत व भरपाई द्यावी, तसेच गोडवली परिसरात भूवैज्ञानिकांची तज्ज्ञ समिती पाठवून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.
स्थानिकांच्या मते, केवळ पाहणी आणि अहवालांपुरते मर्यादित न राहता आता प्रत्यक्ष कृतीची वेळ आली आहे. अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासनाने तातडीने या भागावर लक्ष ठेवून आवश्यक ती प्रतिबंधात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
Comments
Post a Comment