लॉडविक पॉइंट मार्गावर प्रचंड वृक्ष कोसळला; वाहतूक ठप्प, नगरपालिकेच्या तातडीच्या कारवाईने रस्ता पुन्हा खुला
लॉडविक पॉइंट मार्गावर प्रचंड वृक्ष कोसळला; वाहतूक ठप्प, नगरपालिकेच्या तातडीच्या कारवाईने रस्ता पुन्हा खुला
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता शहरातील प्रमुख पर्यटन मार्गांनाही बसू लागला आहे. शहरातील लॉडविक पॉइंटकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सोमवारी सकाळी एक प्रचंड वृक्ष अचानक कोसळल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. पर्यटक आणि स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर नगरपालिकेने तातडीने यंत्रणा घटनास्थळी रवाना केली. नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या आदेशानुसार नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आवश्यक यंत्रसामग्रीसह घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर आडवे पडलेले अवाढव्य झाड कटरच्या साहाय्याने तुकडे करून हटविण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.
कर्मचाऱ्यांनी अत्यंत वेगाने आणि दक्षतेने काम पूर्ण केल्यामुळे काही वेळातच रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला. त्यामुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुर्घटना घडली नाही.
महाबळेश्वर परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या आणि भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी तसेच पर्यटकांनी अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळावा आणि पावसाळ्यात डोंगराळ तसेच जंगल परिसरातील मार्गांवर विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देत रस्ता अल्पावधीत मोकळा केल्याबद्दल नागरिकांकडून नगरपालिका प्रशासनाच्या तत्पर कारवाईचे कौतुक करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment