गोगवे आश्रमशाळेत शिक्षकांचा दुष्काळ; १५० विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ? मुख्याध्यापकासह १२ पदे रिक्त; निकृष्ट विकासकामांची चौकशी करून दोषींवर कारवाईची ग्रामस्थांची मागणी


गोगवे आश्रमशाळेत शिक्षकांचा दुष्काळ; १५० विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ?

मुख्याध्यापकासह १२ पदे रिक्त; निकृष्ट विकासकामांची चौकशी करून दोषींवर कारवाईची ग्रामस्थांची मागणी

✍️संतोष मालुसरे,

तापोळा  प्रतिनिधी : 

महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम गोगवे येथील शासकीय आश्रमशाळेत शिक्षक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने सुमारे १५० विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सचिन कदम यांनी केला आहे. मुख्याध्यापकासह तब्बल १२ शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे संपूर्ण शैक्षणिक व्यवस्था तासिका तत्त्वावरील व रोजंदारीवरील शिक्षकांच्या भरवशावर सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील माध्यमिक मुख्याध्यापकाचे एकमेव पद रिक्त असून, चार माध्यमिक शिक्षक, एक पदवीधर प्राथमिक शिक्षक आणि सहा प्राथमिक शिक्षक अशी एकूण १२ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. तसेच अधीक्षिका पदही रिक्त असून केवळ अधीक्षक (पुरुष) यांचे एक पद भरलेले आहे. परिणामी शाळेच्या शैक्षणिक तसेच प्रशासकीय कामकाजावर मोठा ताण निर्माण झाला आहे.

सध्या बाह्यस्त्रोतावरील चार शिक्षक आणि काही रोजंदारीवरील शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू असले तरी ही व्यवस्था तात्पुरती असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची चिंता पालकांनी व्यक्त केली आहे. नियमित शिक्षक नसल्यामुळे अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणे, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देणे, शैक्षणिक उपक्रम प्रभावीपणे राबविणे तसेच गुणवत्तावाढीचे नियोजन करणे कठीण होत असल्याचेही सांगितले जात आहे.

सामाजिक कार्यकर्ते सचिन कदम यांनी सांगितले की, दुर्गम भागातील आदिवासी व ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शासनाने आश्रमशाळा सुरू केल्या आहेत. मात्र गोगवे आश्रमशाळेत आवश्यक शिक्षक आणि कर्मचारीच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याशी तडजोड होत आहे. शासनाने या शाळेतील सर्व रिक्त पदे तातडीने भरून नियमित शैक्षणिक व्यवस्था उभी करावी, अशी त्यांनी मागणी केली.

मुख्याध्यापक पद रिक्त असल्यामुळे शाळेच्या प्रशासनावरही विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विविध प्रशासकीय निर्णय, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वेतनाशी संबंधित कामे, शालेय विकासकामांचे नियोजन आणि देखरेख यामध्ये अडथळे निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, शाळेत नुकत्याच करण्यात आलेल्या विकासकामांबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. शाळेच्या परिसरात बांधण्यात आलेला नवीन काँक्रीट रस्ता निकृष्ट दर्जाचा असून काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांच्या पावसानंतरच त्यावर मोठ्या प्रमाणात तडे गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित काम अंदाजपत्रकानुसार न झाल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा सचिन कदम यांनी केला आहे.

याशिवाय, शाळेच्या जेवणखोलीच्या दुरुस्तीच्या कामातही मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही पत्र्याखाली वापरण्यात आलेल्या लोखंडी संरचनेला वेल्डिंग न करता केवळ वायरने बांधणी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच अंदाजपत्रकात नमूद असलेल्या फरशी, दरवाजे, खिडक्या, लाईट फिटिंग आदी अनेक कामांची प्रत्यक्षात अंमलबजावणीच करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे रस्त्याच्या बांधकामासाठी वापरलेले साहित्य शाळेच्या मैदानातून हटविण्यात आले नसल्याने विद्यार्थ्यांचे खेळाचे मैदानही खराब झाले आहे. सध्या विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी योग्य मैदान उपलब्ध नसल्याची खंत पालक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या सर्व कामांवर देखरेख करणारे जबाबदार अधिकारी नसल्यामुळेच अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोपही करण्यात आला.

गोगवेसारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी मुख्याध्यापकासह सर्व रिक्त शिक्षक पदे तातडीने भरावीत, शाळेतील प्रशासकीय अडचणी दूर कराव्यात तसेच निकृष्ट दर्जाच्या विकासकामांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन कदम, पालक आणि ग्रामस्थांनी शासनाकडे केली आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl