भेगांनी वाढवली धास्ती; महाबळेश्वरातील धोकादायक गावांची मंत्री मकरंद पाटील यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
महाबळेश्वर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विक्राळ अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये दरडी कोसळणे, जमिनीला मोठमोठ्या भेगा पडणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांनी आज नावली आणि विवर या अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत ग्रामस्थांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि शासन कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची ठाम ग्वाही दिली.
महाबळेश्वर तालुक्यात ४, ५ आणि ६ तारखेदरम्यान अवघ्या तीन दिवसांत सुमारे १०० इंच पावसाची नोंद झाली. या अभूतपूर्व पावसामुळे अनेक डोंगर उतार अस्थिर झाले असून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत. अनेक गावांमध्ये जमिनीला तडे गेले असून काही ठिकाणी घरांच्या परिसरातही भेगा पडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
विवर गावाच्या पाहणीदरम्यान मंत्री मकरंद आबा पाटील यांनी सांगितले की, "या गावामध्ये डोंगराच्या माथ्यापासून ते गावाच्या खालच्या भागापर्यंत मोठ्या स्वरूपाची भेग पडलेली आहे. आजही या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात या गावाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोणतीही जोखीम न घेता वैज्ञानिक पद्धतीने परिस्थितीचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे."
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी पाहणीदरम्यानच जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत भूगर्भशास्त्रज्ञांच्या तज्ज्ञ पथकाला तातडीने घटनास्थळी पाठविण्याचे आदेश दिले. विवरसह अन्य धोकादायक गावांचे भूगर्भीय सर्वेक्षण त्वरित करून सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. संबंधित गावांची माहिती तात्काळ पाठवून सर्वेक्षणात कोणताही विलंब होऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दूरध्वनीवरील संभाषणात मंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देताना सांगितले, "अतिवृष्टीमुळे दोन-तीन गावांमध्ये मोठ्या भेगा पडल्या आहेत. काही गावे धोक्याच्या स्थितीत आहेत. भूगर्भतज्ज्ञांची टीम तातडीने पाठवून सर्वेक्षण पूर्ण करा. अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करणे अधिक सोपे होईल. संबंधित गावांची नावे मी तात्काळ पाठवितो. तुम्ही स्वतः या कामाकडे वैयक्तिक लक्ष द्या."
ग्रामस्थांशी संवाद साधताना त्यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले. भूगर्भशास्त्रज्ञांच्या अहवालानुसार ज्या गावांचे पुनर्वसन आवश्यक ठरेल, त्या गावांचे नियोजनबद्ध आणि सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. आवश्यक निधी, निवारा आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कोणतीही कमी पडू देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी ग्रामस्थांनी सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतजमिनींचे झालेले नुकसान, घरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, दरडी कोसळण्याची भीती आणि विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था याबाबत मंत्र्यांसमोर व्यथा मांडल्या. काही ठिकाणी जमिनीतील भेगा दिवसेंदिवस वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री पाटील यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देत धोकादायक ठिकाणांवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे, आवश्यकतेनुसार नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याची तयारी ठेवण्याचे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने मदत पोहोचविण्याचे आदेश दिले.
मंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे नावली, विवर आणि परिसरातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून शासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचा विश्वास निर्माण झाला आहे. आता भूगर्भशास्त्रज्ञांच्या अहवालानंतर पुढील उपाययोजना आणि आवश्यकतेनुसार पुनर्वसनाबाबत निर्णय होणार असल्याने संपूर्ण महाबळेश्वर तालुक्याचे लक्ष या अहवालाकडे लागले आहे.
Comments
Post a Comment