आंबेनळी घाटावर दरडीची टांगती तलवार कायम; पुन्हा मातीचा ओघ खाली आल्याने धोका वाढला, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे प्रशासनाचे आवाहन



आंबेनळी घाटावर दरडीची टांगती तलवार कायम; पुन्हा मातीचा ओघ खाली आल्याने धोका वाढला, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे प्रशासनाचे आवाहन

पोलादपूर प्रतिनिधी :

पावसाळ्याला सुरुवात होताच रायगड जिल्ह्यातील पोलादपूर आणि सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट पुन्हा एकदा धोक्याच्या छायेत आला आहे. मुसळधार पावसामुळे घाट परिसरात दरडी कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत असून गुरुवारी पुन्हा एकदा पोलादपूर हद्दीतील घाट परिसरात मातीचा ओघ खाली आल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आंबेनळी घाटावरील दरडीची टांगती तलवार कायम असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.


गुरुवारी सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे रानकडसरी, दाभिल टोक तसेच घाटातील इतर काही दरडप्रवण भागांमध्ये मातीचे ओसरे खाली आल्याचे दिसून आले. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता वाढली असून प्रशासनाने तातडीने यंत्रणा घटनास्थळी पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. काही ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर आलेली माती हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्यात आले.

यापूर्वी दोन दिवसांपूर्वीही आंबेनळी घाटात मोठी दरड कोसळल्यामुळे वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. ही दरड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी प्रशासनाला सुमारे दोन तासांची मोठी कसरत करावी लागली होती. त्यानंतर पुन्हा गुरुवारी मुसळधार पावसात घाटात माती व दगड खाली आल्याने वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला. प्रशासनाने तातडीने यंत्रणा कार्यरत करत रस्ता साफ करण्यास प्राधान्य दिले आणि काही काळासाठी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली.

आंबेनळी घाट हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असला तरी पावसाळ्यात हा मार्ग दरडी, दाट धुके, कमी दृश्यमानता आणि रस्त्यावर पाणी साचण्यामुळे अत्यंत धोकादायक ठरतो. सततच्या पावसामुळे डोंगरकड्यांवरील माती सैल होत असल्याने कोणत्याही क्षणी दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहनचालक, पर्यटक आणि प्रवाशांनी विशेष दक्षता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.

घाटातील परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय आंबेनळी घाटातून प्रवास टाळावा, असे आवाहन पोलादपूर प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच शक्य असल्यास पुणे मार्गे अथवा कराड–चिपळूण या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा मुसळधार पावसादरम्यान घाटातून प्रवास टाळावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रवास करावाच लागल्यास वाहनांचा वेग नियंत्रित ठेवणे, सुरक्षित अंतर राखणे, दरडप्रवण भागात अनावश्यक थांबणे टाळणे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे तहसीलदार कपिल घोरपडे यांनी सांगितले आहे. तसेच घाट परिसरात दरड कोसळणे, झाड पडणे, रस्ता खचणे किंवा अन्य कोणतीही धोकादायक घटना आढळल्यास तत्काळ पोलादपूर तहसील कार्यालय, पोलीस प्रशासन किंवा आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

सध्या कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा जोर कायम असल्याने आंबेनळी घाटातील परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून नागरिकांच्या सहकार्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळणे शक्य होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl