बंद घरात सिलिंडरचा भीषण स्फोट; सुदैवाने जीवितहानी टळली, परिसरात भीतीचे वातावरण
बंद घरात सिलिंडरचा भीषण स्फोट; सुदैवाने जीवितहानी टळली, परिसरात भीतीचे वातावरण
सातारा प्रतिनिधी :
सातारा शहरातील मंगळवार पेठ परिसरातील पॉवरहाऊस येथे यवतेश्वर घाटरस्त्याच्या पायथ्याशी असलेल्या संत कबीर सोसायटीतील एका बंद घरात शनिवारी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की परिसरात काही काळ भीती आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घर बंद असताना अचानक मोठा स्फोटाचा आवाज झाला. या आवाजाने परिसरातील नागरिक घाबरून घराबाहेर धावत आले. स्फोटाची तीव्रता मोठी असल्याने घराच्या काही भागाचे नुकसान झाले असून खिडक्या, दरवाजे तसेच घरातील काही वस्तूंचीही हानी झाल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दल आणि संबंधित यंत्रणांना याबाबत कळविले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम केले. स्फोटामुळे परिसरात काही काळ नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
प्राथमिक माहितीनुसार, घरामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी आणि त्यानंतर घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे. तसेच या घटनेमागील नेमक्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, स्फोटाच्या वेळी घरात कोणीही उपस्थित नसल्याने मोठी दुर्घटना टळली असून नागरिकांनीही याबाबत समाधान व्यक्त केले आहे. मात्र, बंद घरांमधील विद्युत उपकरणांची सुरक्षितता आणि गॅस यंत्रणेची नियमित तपासणी करण्याची आवश्यकता या घटनेनिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
Comments
Post a Comment