'नीट' आंदोलनाचा राजकीय वापर टाळा; दोषींना मोदी सरकार सोडणार नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे



'नीट' आंदोलनाचा राजकीय वापर टाळा; दोषींना मोदी सरकार सोडणार नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

✍️संतोष मालुसरे,

तापोळा प्रतिनिधी :

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी सातारा जिल्ह्यातील दरे येथे मुक्कामी आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि त्यावर सुरू असलेल्या राजकारणावर त्यांनी भाष्य केले. नीट परीक्षा पेपरफुटी ही अत्यंत दुर्दैवी घटना असून लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित या गंभीर विषयाचे राजकारण करणे योग्य नसल्याची भूमिका त्यांनी मांडली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आधार घेऊन काही राजकीय पक्ष स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाई होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की, नीट परीक्षा पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला आक्रोश आणि आंदोलन स्वाभाविक आहे. लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य या परीक्षेशी जोडलेले असल्याने त्यांच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे. मात्र, या प्रश्नाचे राजकारण करून विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न होणे अधिक दुर्दैवी आहे.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आंदोलनावर टीका करताना शिंदे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने जंतरमंतरऐवजी थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे जाण्याचा प्रयत्न करणे हे अत्यंत बेजबाबदार वर्तन आहे. पंतप्रधानांचे निवासस्थान हे देशातील सर्वाधिक संवेदनशील आणि उच्च सुरक्षा क्षेत्रांपैकी एक आहे. देशाने यापूर्वी दोन पंतप्रधान गमावले असून १९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर एसपीजी कायदा करण्यात आला. त्यामुळे अशा ठिकाणी आंदोलन करण्याचा प्रयत्न हा गंभीर सुरक्षा प्रश्न निर्माण करणारा आहे.

ते पुढे म्हणाले की, ज्या ठिकाणी आंदोलनास परवानगी नाही, त्या ठिकाणी लोकांना "इकडे या, इकडे या" असे आवाहन करणे योग्य नाही. एखाद्या नेत्याचे स्वतःच्या कार्यकर्त्यांवर नियंत्रण असले तरी जमावाच्या मानसिकतेवर कोणाचेही नियंत्रण राहत नाही. अशा परिस्थितीत कोणताही अनुचित प्रकार घडला असता तर त्याची जबाबदारी कोणाची असती, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. काही घातपाताचा प्रयत्न होता का, अशी शंका निर्माण होणे स्वाभाविक असल्याचेही त्यांनी म्हटले.

बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका यांची उदाहरणे देत भारतातही अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे का, अशी शंका उपस्थित करत शिंदे म्हणाले की, आपल्या देशाची बदनामी देशात आणि परदेशात करून भारताच्या प्रगतीला खीळ घालण्याचा प्रयत्न होऊ नये. भारत आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत असून तरुणांना शिक्षण, रोजगार आणि विविध क्षेत्रांत संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे.

नीट परीक्षा पुन्हा अत्यंत काटेकोरपणे घेण्यात आल्याचे सांगताना त्यांनी नमूद केले की, नव्या परीक्षेला सुमारे २२ लाख विद्यार्थी बसले आणि जवळपास ११ लाख विद्यार्थी पात्र ठरले. त्याचबरोबर जेईई परीक्षेला सुमारे १६ लाख आणि सीयूईटी परीक्षेला सुमारे १५ ते १६ लाख विद्यार्थी बसले. म्हणजेच जवळपास ४० ते ५० लाख विद्यार्थ्यांच्या विविध परीक्षा सुरळीत पार पडल्या. केंद्र सरकारने संरक्षण विभाग आणि हवाई दलाचीही मदत घेऊन परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पाडल्याचे त्यांनी सांगितले.

एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतल्याचे सांगत शिंदे म्हणाले की, या प्रकरणातील एकाही दोषीला सोडले जाणार नाही. ज्यांनी गैरप्रकार केला आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गेल्या दहा-बारा वर्षांत मोदी सरकारने शिक्षण क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली असून देशभरात नवीन एम्स, आयआयटी, आयआयएम यांसारख्या संस्थांची उभारणी करण्यात आली आहे. स्टार्टअप संस्कृतीला चालना देत तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

राहुल गांधी यांनी पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशी केलेली मागणी फेटाळताना शिंदे म्हणाले की, विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी केलेले आंदोलनच बेजबाबदार होते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांऐवजी काही नेते २०२९ च्या निवडणुका, सरकार बदलण्याच्या घोषणा करत असल्याची टीका त्यांनी केली.

"आमच्या संवेदना विद्यार्थ्यांसोबत आहेत. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. मात्र विद्यार्थ्यांनीही आपल्या आंदोलनाचा राजकीय गैरवापर होणार नाही, याची काळजी घ्यावी. अनेक प्रश्न चर्चा आणि संवादातून सुटू शकतात. त्यामुळे आंदोलन योग्य मुद्द्यांपुरतेच मर्यादित राहावे आणि कोणालाही विद्यार्थ्यांच्या भावनांचा राजकीय फायदा घेण्याची संधी मिळू नये," असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl