मुख्यमंत्री फडणवीसांकडे पंचक्रोशीच्या विकासासाठी पुन्हा साकडे!

मुख्यमंत्री फडणवीसांकडे पंचक्रोशीच्या विकासासाठी पुन्हा साकडे!

रस्ते, आरोग्य, बंधारा आणि एसटी सेवेसह पाच प्रमुख मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची अनंत जाधव यांची मागणी

 महाबळेश्वर | प्रतिनिधी

महाबळेश्वर तालुक्यातील पंचक्रोशी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी विशेष कार्यकारी अधिकारी (S.E.O.) आणि पत्रकार अनंत शंकर जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा सविस्तर निवेदन सादर करून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. अनेक वर्षांपासून विविध प्रश्नांबाबत सातत्याने निवेदने देऊनही प्रशासनाकडून ठोस निर्णय झाला नसल्याची खंत व्यक्त करत, पंचक्रोशीतील नागरिकांना अजूनही रस्ते, आरोग्य, वाहतूक आणि पाणीपुरवठ्यासारख्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

अनंत जाधव यांनी सांगितले की, सातारा जिल्ह्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच अनेक मंत्र्यांचे प्रतिनिधित्व लाभले असतानाही महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम पंचक्रोशी भाग विकासापासून वंचित आहे. शासनाने आता तरी या भागातील नागरिकांच्या अडचणी गांभीर्याने घेऊन तातडीने निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

निवेदनात सर्वाधिक महत्त्व झांजवड–तळेमाळ या सुमारे एक किलोमीटरच्या अपूर्ण रस्त्याला देण्यात आले आहे. हा रस्ता पूर्ण करून डांबरीकरण झाल्यास नागरिकांचा तब्बल ७० किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास वाचेल आणि वाहतुकीचा मोठा प्रश्न सुटेल, असे जाधव यांनी नमूद केले आहे.

याशिवाय वाडा कुंभरोशी–तापोळा या अत्यंत खराब अवस्थेतील रस्त्याचे तीन पदरी रुंदीकरण करण्यात यावे, तसेच देवळी–कळमगाव मार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने प्रवाशांना आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

चतुरबेट येथील अनेक वर्षांपूर्वी वाहून गेलेल्या बंधाऱ्याच्या जागी नवीन बंधारा उभारण्यात यावा किंवा कोल्हापूर पद्धतीचा (K.T.) बंधारा मंजूर करून बांधण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. यामुळे परिसरातील शेती आणि पाणीसाठ्याला मोठा फायदा होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दुधगाव येथील आरोग्य उपकेंद्रासाठी निधी मंजूर होऊन दोन वर्षांहून अधिक कालावधी लोटला असतानाही प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. हे काम तातडीने सुरू करण्याची मागणी करत, स्वातंत्र्यानंतरही ग्रामीण नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधांसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याची खंत जाधव यांनी व्यक्त केली आहे.

सार्वजनिक वाहतुकीच्या प्रश्नावरही त्यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे. वाडा कुंभरोशी ते तापोळा दरम्यान दर दोन तासांनी एसटी महामंडळाची मिनी बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या सेवेमुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.

राज्यात कोट्यवधी रुपयांचे विकास प्रकल्प राबविले जात असताना पंचक्रोशीतील नागरिक अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याची खंत व्यक्त करत, या सर्व मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन संबंधित विभागांना आवश्यक आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी अनंत जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, पंचक्रोशीतील नागरिकांनीही या मागण्यांना पाठिंबा दर्शविला असून, शासनाने विलंब न लावता विकासकामांना गती द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पंचक्रोशीच्या विकासासाठी हे निवेदन महत्त्वाचे मानले जात असून, आता मुख्यमंत्री कार्यालय आणि संबंधित विभाग यावर कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

▌विशेष : पंचक्रोशीच्या पाच प्रमुख मागण्या

  • झांजवड–तळेमाळ रस्ता पूर्ण करून डांबरीकरण.
  • वाडा कुंभरोशी–तापोळा रस्त्याचे तीन पदरी रुंदीकरण व देवळी–कळमगाव मार्गाचे काम पूर्ण करणे.
  • चतुरबेट येथे नवीन किंवा के.टी. बंधारा उभारणे.
  • दुधगाव आरोग्य उपकेंद्राचे रखडलेले बांधकाम तातडीने सुरू करणे.
  • वाडा कुंभरोशी–तापोळा मार्गावर एसटीची मिनी बस सेवा सुरू करणे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl