अफझल खान कबर परिसरात कलम १६३ लागू; ३१ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी
अफझल खान कबर परिसरात कलम १६३ लागू; ३१ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी
प्रतापगड प्रतिनिधी :
प्रतापगड परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी प्रतापगड येथील अफझल खान कबर परिसराच्या सभोवतालच्या ३०० मीटर क्षेत्रात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) २०२३ मधील कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
या आदेशानुसार संबंधित परिसरात कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर जमावबंदी, घोषणाबाजी, शस्त्र अथवा धोकादायक वस्तूंचे प्रदर्शन, तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणाऱ्या कृतींवर निर्बंध राहणार आहेत. परिसरातील शांतता, सुव्यवस्था आणि सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरवर्षी प्रतापगड परिसरात विविध संघटना, नागरिक आणि पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. यावेळी कोणताही तणाव निर्माण होऊ नये आणि सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी पोलिस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे.
सदर आदेश ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत लागू राहणार असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि इतर लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment