महाबळेश्वर–तापोळा मार्गासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची अभूतपूर्व एकजूट; रात्रंदिवस प्रयत्नांनंतर वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात१०५ गावांच्या जीवन वाहिनीच्या बचावासाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर; अफवांपासून दूर राहण्याचे प्रशासनाचे आवाहन
महाबळेश्वर–तापोळा मार्गासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची अभूतपूर्व एकजूट; रात्रंदिवस प्रयत्नांनंतर वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात
१०५ गावांच्या जीवनवाहिनीच्या बचावासाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर; अफवांपासून दूर राहण्याचे प्रशासनाचे आवाहन
महाबळेश्वर प्रतिनिधी :
अतिवृष्टीमुळे खचलेल्या महाबळेश्वर–तापोळा या १०५ गावांच्या प्रमुख दळणवळणाच्या मार्गासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी दाखविलेली एकजूट हा संपूर्ण तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून तहसील प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), महाबळेश्वर नगरपालिका, वन विभाग, १०५ गाव नियोजन समितीचे पदाधिकारी आणि अनेक स्वयंसेवक घटनास्थळी रात्रंदिवस कार्यरत असून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
तापोळा–महाबळेश्वर हा मार्ग १०५ गावांसाठी जीवनवाहिनी मानला जातो. अतिवृष्टीमुळे रस्ता खचल्याने नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि अत्यावश्यक सेवांवर मोठा परिणाम झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने यंत्रणा कार्यान्वित केली. दिवसभर अधिकारी, अभियंते, कर्मचारी आणि स्थानिक प्रतिनिधींनी घटनास्थळी राहून दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेतला तसेच पर्यायी उपाययोजनांवरही भर दिला.
प्राथमिक माहितीनुसार रस्ता शक्य तितक्या लवकर वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असून काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. नागरिकांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच सोशल मीडियावरून पसरवल्या जाणाऱ्या अप्रमाणित संदेशांवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचेही सांगण्यात आले आहे.
या संपूर्ण काळात अनेक नागरिकांनी स्वतःचा व्यवसाय आणि वैयक्तिक कामे बाजूला ठेवून रस्ता पूर्ववत करण्यासाठी योगदान दिले. "ही टीम भागातील लोकांसाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहे. समाज त्यांच्या कार्याला कधीही विसरणार नाही," अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. महाबळेश्वर शहर आणि तापोळा ग्रामीण भागातील नागरिकांनी एकत्र येत संकटावर मात करण्यासाठी दाखविलेली एकजूट सर्वत्र कौतुकाचा विषय ठरली.
नगरसेवक आबा शिंदे यांनीही दिवसभर घटनास्थळी उपस्थित राहून सहकार्य केले. तसेच जिल्हा परिषद सदस्य अजित संकपाळ, पंचायत समिती उपसभापती संजय मोरे, विशाल संकपाळ, राम संकपाळ, भाऊ मोरे, सुभाष कारंडे, उत्तम भालेराव,लक्ष्मण शिंदे (देवळी), संपत जाधव (चिखली), किशोर जंगम (तलदेव), संजय जंगम, देवळीचे सरपंच, अशोक ढेबे, अंकुश अखाडे (कारवी आळा), राहुल भोसले, एकनाथ शेलार, राजू सकपाळ (गावडोशी), गणेश भोपळे, गणेश धनावडे, समीर कदम, अजय उतेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी समन्वय साधत महत्त्वाची भूमिका बजावली.
सोशल मीडियावरून या प्रश्नाला वाचा फोडणाऱ्या पत्रकार बांधवांसह विविध समाजबांधवांचेही आभार व्यक्त करण्यात आले. स्थानिकांच्या मते, या संकटाने संपूर्ण महाबळेश्वर तालुक्याला एकत्र आणले असून भविष्यात १०५ गावांच्या कायमस्वरूपी दळणवळणाच्या प्रश्नासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज अधिक प्रकर्षाने पुढे आली आहे.
रस्ता पूर्ववत करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळावे आणि १०५ गावांतील जनजीवन लवकरात लवकर सुरळीत व्हावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे संकटावर मात करण्याचा विश्वासही व्यक्त केला जात आहे.
Comments
Post a Comment