मुसळधार पावसाचा फटका! नावली गावातील काही भाग खचला; प्रशासनाकडून नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर, गावाला कोणताही धोका नसल्याची तहसीलदा सचिन मस्के यांची ग्वाही

मुसळधार पावसाचा फटका! नावली गावातील काही भाग खचला; प्रशासनाकडून नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर, गावाला कोणताही धोका नसल्याची तहसीलदा सचिन मस्के यांची ग्वाही

प्रतापगड प्रतिनिधी :

महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका नावली गावाला बसला असून गावाच्या वरच्या बाजूचा काही भाग शनिवारी सकाळी अतिवृष्टीमुळे खचल्याची घटना घडली आहे. या घटनेत झाडांसह मोठ्या प्रमाणावर माती आणि दगडांचा मलबा खालील रस्त्यावर वाहून आल्याने परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सुरुवात केली असून नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.


घटनेनंतर महसूल प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. संबंधित भागातील मलबा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून रस्ता पूर्ववत करण्यासाठी यंत्रसामग्रीच्या सहाय्याने साफसफाईचे काम सुरू आहे.

दरम्यान, ज्या ठिकाणी जमिनीचा भाग खचला त्या परिसरात गावाची पाण्याची टाकी असल्यामुळे प्रशासनाने अतिरिक्त खबरदारी घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंते प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून पाण्याच्या टाकीच्या सुरक्षिततेचे परीक्षण करत आहेत. भविष्यात कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.

घटनास्थळापासून काही अंतरावर चार घरे असून त्यापैकी एक घर बंद अवस्थेत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. उर्वरित तीन घरांमधील रहिवाशांना समजावून सांगून त्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. या कुटुंबांची आवश्यक ती काळजी प्रशासनाकडून घेतली जात असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी खरमाटे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या. प्रशासनाकडून संपूर्ण परिसरावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर काही ठिकाणी विविध अफवा पसरत असल्याचे निदर्शनास आले असून प्रशासनाने त्याचे खंडन केले आहे. गावाला कोणत्याही प्रकारचा तातडीचा धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अप्रमाणित माहिती प्रसारित करू नये, असे आवाहन तहसीलदार सचिन मस्के यांनी केले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl