भर पावसात नगरसेवक रस्त्यावर! गटारे स्वच्छ करून पाणी वाहून जाण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न; नागरिक-पर्यटकांना दिलासा
भर पावसात नगरसेवक रस्त्यावर! गटारे स्वच्छ करून पाणी वाहून जाण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न; नागरिक-पर्यटकांना दिलासा
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शनिवारी एका दिवसातच सुमारे २० इंच पावसाची नोंद झाल्याने शहरातील अनेक भागांत पाणी साचले. काही ठिकाणी गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यांवरून वाहू लागले होते. या पार्श्वभूमीवर नागरिक आणि पर्यटकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी महाबळेश्वर नगर परिषदेचे नगरसेवक भर पावसात स्वतः रस्त्यावर उतरून काम करताना दिसले.
नगरसेवक समीर सुतार, संतोषआबा शिंदे तसेच भाजपचे नगरसेवक रवींद्र कुंभारदरे यांनी विविध भागांची पाहणी करत जेसीबीच्या साह्याने तुंबलेली गटारे स्वच्छ करण्याचे काम करून घेतले. पावसाचे पाणी सुरळीतपणे वाहून जावे, रस्त्यांवर पाणी साचू नये आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी संबंधित यंत्रणांसोबत समन्वय साधत कामाला गती दिली.
मुसळधार पावसातही नगरसेवक स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून कामावर लक्ष ठेवत असल्याने नागरिकांनी त्यांच्या तत्परतेचे स्वागत केले. शहरात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांचीही गर्दी असल्याने पाणी साचल्यामुळे अपघात किंवा गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या.
यावेळी बोलताना नगरसेवक संतोषआबा शिंदे म्हणाले, "नगरसेवक म्हणून नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आमची आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी समस्या निर्माण झाल्या असल्या तरी येणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना होणारा त्रास शक्य तितका कमी करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. आवश्यक त्या सर्व ठिकाणी तातडीने उपाययोजना करून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील."
महाबळेश्वरमध्ये अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासनासह लोकप्रतिनिधीही सतर्क असून, आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित मदत उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
Comments
Post a Comment