"नगरपालिकेच्या दुर्लक्षाचा फटका; नागरिकच उतरले रस्त्यावर! स्कूल मोहल्ला–अंबिका–नामदेव सोसायटीत संताप, तातडीच्या नियोजनाची मागणी



"नगरपालिकेच्या दुर्लक्षाचा फटका; नागरिकच उतरले रस्त्यावर! स्कूल मोहल्ला–अंबिका–नामदेव सोसायटीत संताप, तातडीच्या नियोजनाची मागणी"

महाबळेश्वर प्रतिनिधी :

महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक भागांना मोठा फटका बसला असून, नगरपालिकेच्या कथित दुर्लक्षामुळे नागरिकांनाच फावडे हाती घेऊन रस्ते दुरुस्त करण्याची वेळ आल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. गेल्या ४८ तासांत महाबळेश्वरमध्ये तब्बल ३६ इंच पावसाची नोंद झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचणे, रस्ते वाहून जाणे आणि ड्रेनेज व्यवस्था कोलमडण्याच्या घटना घडल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे स्कूल मोहल्ला, अंबिका सोसायटी आणि नामदेव सोसायटी परिसरातील अनेक घरांमध्ये पावसाचे तसेच ड्रेनेजचे पाणी शिरले. प्रारंभी नगरपालिका अधिकारी, कर्मचारी आणि काही स्थानिक लोकप्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. मात्र काही तासांनंतर प्रत्यक्ष कामकाज थांबल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. केवळ पाहणी करून छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली, परंतु प्रत्यक्षात समस्या कायम राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

स्कूल मोहल्ल्यातील गल्ल्यांमधून अतिवृष्टीदरम्यान एवढ्या वेगाने पाणी वाहत होते की, त्या गल्ल्यांमधून नदीच वाहत असल्याचा भास निर्माण झाला होता. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गेली वीस वर्षे या भागात पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होत असून, पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. परिणामी दरवर्षी नागरिकांना त्याच समस्यांचा सामना करावा लागत आहे.

स्कूल मोहल्ल्यातून येणारे पाणी पुढे अंबिका व नामदेव सोसायटीकडे वाहते. यावेळी पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की सोसायटीकडे जाणारा डांबरी रस्ता वाहून गेला. त्यामुळे वाहनांची तसेच नागरिकांची ये-जा धोकादायक बनली. मात्र या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाकडून तातडीची दुरुस्ती करण्यात आली नसल्याचा आरोप होत आहे. अखेर स्थानिक नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत फावडे हाती घेतले, रस्त्यावर डबल टाकून खड्डे तात्पुरते बुजवले आणि पाण्याच्या प्रवाहाला मार्ग करून दिला. नागरिकांनी केलेल्या या कामामुळे तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी कायमस्वरूपी उपाययोजनांची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.

दरम्यान, परिसरात नव्याने करण्यात आलेल्या बांधकामादरम्यान जुन्या ड्रेनेज चेंबरवरच बांधकाम झाल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे. चेंबर फुटल्यामुळे ड्रेनेजचे पाणी सतत वाहत असून परिसरात अस्वच्छता आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, कचरा गाडी किंवा अन्य अत्यावश्यक वाहने ये-जा करू शकणार नाहीत, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, महाबळेश्वरमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व काळात गटारे साफ करणे, पाण्याचा निचरा सुरळीत ठेवणे, धोकादायक ठिकाणांची दुरुस्ती करणे आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवणे ही नगरपालिकेची जबाबदारी होती. मात्र योग्य नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.

याशिवाय वेण्णा नदीपात्रातील कथित अतिक्रमणांमुळे पूरस्थिती अधिक गंभीर होत असल्याचाही आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. अशा अतिक्रमणांवर वेळेत कारवाई न झाल्यास भविष्यात मोठी जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नदीपात्रातील अतिक्रमणे हटविणे, ड्रेनेज व्यवस्था सुधारणा, रस्त्यांची तातडीने दुरुस्ती आणि प्रभावी आपत्कालीन नियोजन याबाबत नगरपालिका प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl