कोयना जलाशयातील नागरिकांना मोठा दिलासा!तापोळा येथे तराफा (बार्ज) सेवा पुन्हा सुरू; अजित संकपाळ आणि संजय मोरे यांच्या पाठपुराव्याला यश, लाँच सेवेलाही लवकरच हिरवा कंदील अपेक्षित
कोयना जलाशयातील नागरिकांना मोठा दिलासा!
तापोळा येथे तराफा (बार्ज) सेवा पुन्हा सुरू; अजित संकपाळ आणि संजय मोरे यांच्या पाठपुराव्याला यश, लाँच सेवेलाही लवकरच हिरवा कंदील अपेक्षित
तापोळा | प्रतिनिधी
कोयना जलाशय परिसरातील सोळशी, कांदाटी व आसपासच्या गावांच्या दळणवळणाचा प्रश्न सोडविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले असून तापोळा येथे तराफा (बार्ज) सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषद सदस्य अजित संकपाळ आणि पंचायत समिती महाबळेश्वरचे उपसभापती संजय मोरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही सेवा पुन्हा कार्यान्वित झाली आहे. गेल्या मे महिन्यापासून बंद असलेली ही सेवा सुरू झाल्याने जलाशय परिसरातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, लाँच सेवाही लवकरच सुरू करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे.
कोयना जलाशयातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे मे महिन्यापासून बार्ज सेवा बंद होती. त्यानंतर पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळणे, झाडे रस्त्यावर पडणे, रस्ते वाहून जाणे व दळणवळण खंडित होण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने जलाशय परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास, शेतकऱ्यांचा शेतीमाल, व्यापारी व्यवहार तसेच रुग्णांना वैद्यकीय सेवेसाठी ये-जा करणे अत्यंत कठीण झाले होते.
या गंभीर समस्येची दखल घेत जिल्हा परिषद सदस्य अजित संकपाळ आणि उपसभापती संजय मोरे यांनी संबंधित शासकीय विभागांकडे सातत्याने पाठपुरावा केला. नागरिकांनीही तराफा व लाँच सेवा तातडीने सुरू करण्याची जोरदार मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करत तापोळा येथे बार्ज सेवा पुन्हा सुरू केली.
याबाबत माहिती देताना उपसभापती संजय मोरे यांनी सांगितले की, कोयना जलाशय परिसरातील नागरिकांच्या सुरक्षित दळणवळणासाठी बार्ज आणि लाँच सेवा अत्यंत आवश्यक आहे. हवामानाचा अंदाज, सुरक्षा निकष आणि संबंधित विभागांचे अहवाल विचारात घेऊन शासनाच्या नियमांनुसार पुढील निर्णय घेतला जाणार असून, लाँच सेवा सुरू करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. पावसाळ्यात पर्यायी व सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आज बार्ज सेवा सुरू करण्यात आल्यावेळी जिल्हा परिषद सदस्य अजित संकपाळ, उपसभापती संजय मोरे, तालुकाप्रमुख गणेश उतेकर, युवा सेना जिल्हाप्रमुख विशाल संकपाळ, शिवसागर बोट क्लबचे चेअरमन आनंद धनावडे, उपतालुकाप्रमुख राम संकपाळ, जावली बँकेचे संचालक गणेश भोसले, उपसरपंच तुकाराम धनावडे, माजी चेअरमन दीपक धनावडे, सिताराम धनावडे, युवा नेते किरण माने, प्रमोद कदम, समीर कदम तसेच शिवसागर बोट क्लबचे सदस्य आनंद पांडुरंग धनावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
बार्ज सेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे सोळशी, कांदाटी व जलाशय परिसरातील गावांतील नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. विशेषतः विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा लाभ होणार असून, भविष्यात बार्ज सेवा नियमितपणे सुरू ठेवण्याबरोबरच लाँच सेवाही तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
स्थानिक नागरिकांनी लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याचे स्वागत करत प्रशासनाचे आभार मानले असून, कोयना जलाशय परिसरातील दळणवळणाची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी शासनाने दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment