आंबेनळी घाटात सलग तिसऱ्यांदा दरड; मेटतळे परिसरात मोठे दगड रस्त्यावर, एमएसआरडीसीच्या दुर्लक्षाविरोधात नागरिकांचा संताप पर्यटक व स्थानिकांनी स्वतः दगड हटवून वाहतूक सुरू केली; अधिकाऱ्यांकडून फोनला प्रतिसाद नसल्याची तक्रार

आंबेनळी घाटात सलग तिसऱ्यांदा दरड; मेटतळे परिसरात मोठे दगड रस्त्यावर, एमएसआरडीसीच्या दुर्लक्षाविरोधात नागरिकांचा संताप

पर्यटक व स्थानिकांनी स्वतः दगड हटवून वाहतूक सुरू केली; अधिकाऱ्यांकडून फोनला प्रतिसाद नसल्याची तक्रार

महाबळेश्वर, प्रतिनिधी :
महाबळेश्वर–कुंभरोशी मार्गावरील आंबेनळी घाटातील मेटतळेच्या खालील भागात सलग तिसऱ्यांदा छोट्या प्रमाणात दरड कोसळल्याची घटना घडल्याने वाहनचालक, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी सकाळी या ठिकाणी दोन मोठे दगड थेट रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी अथवा अपघात झाला नसला तरी मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

घटनेनंतर तेथून प्रवास करणारे पर्यटक आणि स्थानिक नागरिक यांनी तत्परता दाखवत रस्त्यावर पडलेले काही दगड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. मात्र, डोंगरकड्यावर अजूनही सैल दगड आणि माती असल्याने पुढील काळात मोठी दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाटातील डोंगरकडे कमकुवत झाले आहेत. परिणामी आंबेनळी घाटात वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना घडत असून सलग तीन वेळा दरड कोसळल्याने संबंधित ठिकाण अत्यंत धोकादायक बनले आहे. पर्यटन हंगामात या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, सदर रस्त्याची देखभाल, दुरुस्ती आणि विकासाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआयडीसी) असून संबंधित विभागाचे कार्यालय पुणे येथे आहे. मात्र, दरडीच्या घटनेनंतर अनेक नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या फोनला प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत संबंधित यंत्रणेकडून त्वरित प्रतिसाद मिळणे अपेक्षित असताना नागरिकांना स्वतःच पुढाकार घेऊन रस्ता मोकळा करावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासन आणि एमएसआरडीसीने तातडीने घटनास्थळी पाहणी करून रस्त्यावर पडलेले उर्वरित दगड हटवावेत, डोंगरकड्यावरील धोकादायक दगड सुरक्षितरीत्या काढावेत तसेच पावसाळ्यात या परिसरात नियमित देखरेख आणि आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित ठेवावी, अशी मागणी केली आहे.

आंबेनळी घाट हा महाबळेश्वर आणि कोकणाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून, वारंवार होणाऱ्या दरडीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वीच संबंधित विभागांनी तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून केली जात आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl