कोयना जलाशयातील दळणवळणाचा प्रश्न ऐरणीवर; 'सर्व्हिस लाँच नको, तराफा तातडीने सुरू करा' अशी नागरिकांची मागणी

कोयना जलाशयातील दळणवळणाचा प्रश्न ऐरणीवर; 'सर्व्हिस लाँच नको, तराफा तातडीने सुरू करा' अशी नागरिकांची मागणी

महाबळेश्वर प्रतिनिधी :

कोयना जलाशयातील पाण्याची पातळी वाढत असताना सोळशी–कांदाटी विभागातील दळणवळणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेऊन तराफा सेवा तातडीने सुरू करावी, मात्र हवामान प्रतिकूल असल्याने सर्व्हिस लाँच सुरू करण्याची घाई करू नये, अशी भूमिका मांडली आहे.

स्थानिक नागरिक विजय शिंदे (दरे) यांनी जिल्हा परिषद सदस्य अजित संकपाळ, पंचायत समिती उपसभापती संजय मोरे आणि पंचायत समिती सदस्य संजय शेलार यांना उद्देशून केलेल्या निवेदनात, कोयना जलाशयातील पाणीपातळी आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन तराफा व सर्व्हिस लाँच सुरू करण्याबाबत प्रशासनाला सूचना द्याव्यात, अशी मागणी केली आहे. पूर्वी दरवर्षी १५ ऑगस्टच्या सुमारास ही सेवा सुरू होत असे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत विलंब न करता निर्णय घेतल्यास सोळशी–कांदाटी परिसरातील शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या मागणीवर नागरिकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी "वादळी वाऱ्यामुळे सर्व्हिस लाँच धोकादायक ठरू शकते; मात्र तराफा सेवा सुरू करावी," अशी भूमिका घेतली. तर काहींनी "१५ ऑगस्टपूर्वी सर्व्हिस लाँच सुरू करणे म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळण्यासारखे ठरेल," अशी चिंता व्यक्त केली.

काही नागरिकांनी "सर्व्हिस लाँच सुरू करण्याची घाई करू नये; सुरक्षिततेच्या दृष्टीने सध्या तराफा सेवा सुरू ठेवावी, हीच जनतेची अपेक्षा आहे," असे मतही नोंदविले.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जलाशयातील पाणीपातळी, हवामानाचा अंदाज आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. तराफा सेवा लवकर सुरू झाल्यास सोळशी–कांदाटी विभागातील दळणवळणाची अडचण मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl