महाबळेश्वर-तापोळा मार्गावर प्रचंड झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प; प्रशासनाच्या युद्धपातळीवरील प्रयत्नांमुळे रस्ता पुन्हा खुला
महाबळेश्वर-तापोळा मार्गावर प्रचंड झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प; प्रशासनाच्या युद्धपातळीवरील प्रयत्नांमुळे रस्ता पुन्हा खुला
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता वाहतूक व्यवस्थेलाही बसू लागला असून, शनिवारी महाबळेश्वर-तापोळा मार्गावरील ग्लेन ओगल धरण परिसरातील हॉटेल फाउंटनसमोर एक प्रचंड मोठे झाड अचानक रस्त्यावर कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. या घटनेमुळे महाबळेश्वरला तापोळा, बामणोली आणि परिसरातील गावांशी जोडणारा मुख्य मार्ग दोन्ही बाजूंनी बंद झाल्याने वाहनधारक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जमिनीची पकड सैल झाल्याने हे मोठे झाड अचानक उन्मळून पडले आणि रस्त्याच्या मधोमध आडवे झाले. सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी त्या ठिकाणावरून कोणतेही वाहन जात नसल्याने मोठी दुर्घटना आणि संभाव्य जीवितहानी टळली. अन्यथा पावसाळी पर्यटन हंगामामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता आली नसती.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच महाबळेश्वर नगरपालिकेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर नगराध्यक्ष सुनील शिंदे आणि मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी परिस्थितीची तात्काळ दखल घेत नगरपालिका आपत्ती विभागाला वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी आणि यंत्रणा तत्काळ कामाला लागल्या.
जेसीबी आणि कटरच्या सहाय्याने झाडाच्या फांद्या आणि खोडाचे तुकडे करून ते बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. झाडाचा आकार अत्यंत मोठा असल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे बंद ठेवावी लागली होती. मात्र प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन टीम आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या समन्वयित प्रयत्नांमुळे अल्पावधीतच रस्ता मोकळा करण्यात यश आले आणि वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
दरम्यान, रस्ता बंद झाल्यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेषतः तापोळा, बामणोली आणि परिसरातील गावांकडे जाणाऱ्या नागरिकांना तसेच पर्यटकांना काही काळ अडचणींचा सामना करावा लागला. रस्ता मोकळा झाल्यानंतर वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
विशेष म्हणजे, "माझं गाव माझी बातमी"मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्ताची नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी तात्काळ दखल घेत संबंधित यंत्रणांना सूचना देत रस्ता त्वरित वाहतुकीसाठी खुला करण्याच्या कामाला गती दिली. प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठा अडथळा दूर झाला आणि नागरिकांची गैरसोय कमी करण्यात यश आले.
महाबळेश्वर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळणे, झाडे उन्मळून पडणे आणि रस्ते बंद होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. दरम्यान, वाहनधारकांनी डोंगराळ आणि घाट परिसरातून प्रवास करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment