रात्री रुग्णालयातील परिचारिका कक्षात संशयास्पदरीत्या प्रवेश; आरोपीला सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा
रात्री रुग्णालयातील परिचारिका कक्षात संशयास्पदरीत्या प्रवेश; आरोपीला सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा
महाबळेश्वर | प्रतिनिधी
महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका कक्षात (नर्स स्टाफ रूम) रात्रीच्या वेळी संशयास्पदरीत्या प्रवेश करून दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून बसलेल्या आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवत सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ४१/२०२५ तसेच न्यायालयीन प्रकरण क्रमांक एससीसी १३७/२०२५ अंतर्गत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १२२ (क) अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणातील आरोपी विठ्ठल कोंडीबा शेलार (वय ३८, रा. कोट्रोशी, ता. महाबळेश्वर, जि. सातारा) याने दि. २ जून २०२५ रोजी रात्री सुमारे ११.३७ वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका कक्षात स्वतःचे अस्तित्व लपवून प्रवेश केला होता. संबंधित ठिकाणी येण्यामागे कोणतेही समाधानकारक अथवा सबळ कारण नसताना दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने तो तेथे बसून असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर महाबळेश्वर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
या प्रकरणात पोलीस शिपाई वैभव शामराव भिलारे यांनी फिर्याद दिली होती.
सुनावणीनंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी उदय इवरे यांनी आरोपीला महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १२२ (क) अंतर्गत दोषी ठरविले. तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम २७५ अन्वये आरोपीस सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.
या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार एस. एम. शेलार यांनी केला. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस शिपाई कुंभार यांनी प्रभावीपणे पैरवी केली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता डी. एम. शेख यांनी कामकाज पाहिले.
या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे (वाई विभाग) तसेच पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे (महाबळेश्वर पोलीस ठाणे) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
विशेष म्हणजे, आरोपीने न्यायालयात स्वतःचा गुन्हा कबूल केला. तसेच आरोपीचे बोटांचे ठसे व गुन्हेगारी नोंदणीसाठी आवश्यक माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Comments
Post a Comment