महाबळेश्वर–सातारा मार्गावरील आंबेघर येथील रामजी बाबा पुलाचा भराव खचला; वाहतूक बंद, प्रशासनाची तातडीची उपाययोजना
महाबळेश्वर–सातारा मार्गावरील आंबेघर येथील रामजी बाबा पुलाचा भराव खचला; वाहतूक बंद, प्रशासनाची तातडीची उपाययोजना
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर–सातारा या महत्त्वाच्या मार्गावरील आंबेघर येथे रामजी बाबा मंदिराशेजारी नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाचा भराव मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर खचल्याने या मार्गावरील वाहतूक तातडीने बंद करण्यात आली आहे. पुलाला जोडणारा भराव वाहून गेल्याने वाहनांची ये-जा पूर्णपणे थांबविण्यात आली असून सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने हा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्याला मोठ्या प्रमाणावर पूर आला होता. पाण्याचा प्रचंड वेग आणि सततच्या पावसामुळे पुलाच्या दोन्ही बाजूंपैकी एका बाजूचा भराव वाहून गेला. त्यामुळे पुलाशी असलेला रस्त्याचा संपर्क तुटला असून या ठिकाणी वाहतूक करणे अत्यंत धोकादायक बनले आहे.
महाबळेश्वर–सातारा मार्ग हा पर्यटन, स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी तसेच अत्यावश्यक सेवांसाठी महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. भराव खचल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. प्रशासनाने नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले असून घटनास्थळी सुरक्षेसाठी बॅरिकेड्स व इशारा फलक लावण्यात आले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. भरावाची तातडीने दुरुस्ती करून मार्ग पूर्ववत सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, नव्याने उभारण्यात आलेल्या पुलालगतचा भराव एवढ्या कमी कालावधीत खचल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची तांत्रिक चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment