जावळी तालुका पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी संतोष मालुसरे; पत्रकारितेतील निर्भीड कार्याचा सन्मान, शुभेच्छांचा वर्षाव
जावळी तालुका पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी संतोष मालुसरे; पत्रकारितेतील निर्भीड कार्याचा सन्मान, शुभेच्छांचा वर्षाव
महाबळेश्वर प्रतिनिधी :
पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रामाणिक, निर्भीड आणि समाजहिताला प्राधान्य देत सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ पत्रकार संतोष मालुसरे यांची जावळी तालुका पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे पत्रकार, सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून मोठ्या उत्साहात स्वागत होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव होत आहे.
जावळी तालुक्यातील पत्रकारितेत संतोष मालुसरे यांनी अनेक वर्षे लोकहिताचे प्रश्न निर्भीडपणे मांडत जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. त्यांच्या प्रामाणिक वृत्ती, निष्पक्ष पत्रकारिता आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत त्यांच्यावर जावळी तालुका पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या निवडीमुळे पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि सत्याला अधिक प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी त्यांना बळ मिळेल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, या निवडीमुळे बामणोली विभागालाही संघटनेत योग्य प्रतिनिधित्व मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, ग्राम सेवा संघ, मुंबई (घावरी) यांच्या वतीने संतोष मालुसरे यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. शुभेच्छा संदेशात, "पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रामाणिकपणे, निर्भीडपणे आणि समाजहिताची जपणूक करत केलेल्या कार्याची ही योग्य पावती असून, आगामी काळात आपण समाजहितासाठी अधिक प्रभावीपणे कार्य कराल, असा विश्वास आहे. आपणास उत्तम आरोग्य, यश आणि उज्ज्वल भवितव्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा," अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.
निवड जाहीर होताच दूरध्वनी, सामाजिक माध्यमे आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे संतोष मालुसरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू असून, पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
Comments
Post a Comment