दाभे दाभेकर ग्रामपंचायत रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त, रस्त्यावर उभ्या केलेल्या लाकडांमुळे अपघाताचा धोका
दाभे दाभेकर ग्रामपंचायत रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त, रस्त्यावर उभ्या केलेल्या लाकडांमुळे अपघाताचा धोका
महाबळेश्वर, प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यातील दाभे दाभेकर गावातील ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे ग्रामस्थांना रोजच त्रास सहन करावा लागत आहे. खालच्या वाडीपासून वरच्या वाडीपर्यंत सुमारे १०० ते १५० मीटर अंतराच्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक व पादचारी यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
धोकादायक ठिकाणी अपघात टाळण्यासाठी काही नागरिकांनी रस्त्याच्या मध्यभागी सुमारे चार लाकडे काही अंतरावर उभी केली आहेत. ही लाकडे खड्ड्यांचा इशारा देण्यासाठी उभी करण्यात आली असली, तरी रात्रीच्या वेळी अथवा पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्यास तीच अपघाताला कारणीभूत ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप केला आहे. पावसाळ्यात या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि दुचाकीस्वारांसह इतर वाहनचालकांना मोठा धोका निर्माण होत आहे.
ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, तसेच संभाव्य अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना त्वरित करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
Comments
Post a Comment