देवसरेतील मुसळधार पावसाने गरीब कुटुंबाचे घर उद्ध्वस्त; भिवाजी जाधव यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरपंचांची ग्वाही
देवसरेतील मुसळधार पावसाने गरीब कुटुंबाचे घर उद्ध्वस्त; भिवाजी जाधव यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरपंचांची ग्वाही
✍️ संतोष मालुसरे,
तापोळा प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका देवसरे गावालाही बसला असून, गावातील भिवाजी रामचंद्र जाधव यांच्या घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले आहे. अत्यंत गरीब परिस्थितीत जीवन जगणाऱ्या जाधव कुटुंबावर या घटनेमुळे मोठे संकट ओढवले असून, त्यांना तातडीने शासकीय मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.
सततच्या पावसामुळे घराच्या एका बाजूची भिंत कोसळल्याने घर असुरक्षित झाले आहे. त्यामुळे कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील पावसात आणखी नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे जाधव कुटुंबासमोर निवाऱ्याचा आणि आर्थिक अडचणींचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.
दरम्यान, या घटनेबाबत देवसरेचे सरपंच मारुती जाधव यांनी माहिती देताना सांगितले की, भिवाजी जाधव हे अत्यंत गरीब कुटुंबातील असून, त्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती शासनापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचविण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाकडून आवश्यक पंचनामा करून त्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरपंच मारुती जाधव म्हणाले, "या कुटुंबाला आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी मी पूर्णपणे बांधील आहे. शासनाकडून त्यांना योग्य ती भरपाई मिळेपर्यंत मी शांत बसणार नाही. या प्रकरणात स्वतः जातीने लक्ष घालून प्रत्येक स्तरावर पाठपुरावा करणार आहे."
ग्रामस्थांनीही महसूल प्रशासनाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून शासनाच्या आपत्ती निवारण निधीतून योग्य ती आर्थिक मदत मंजूर करावी, अशी मागणी केली आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या गरीब कुटुंबांना वेळेत मदत मिळणे गरजेचे असून, प्रशासनाने या प्रकरणाची संवेदनशीलतेने दखल घेऊन भिवाजी रामचंद्र जाधव यांच्या कुटुंबाला तातडीचा आर्थिक दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment