लायन्स क्लब ऑफ मुंबई सॅफ्रॉनच्या अंतर्गत ‘प्रोजेक्ट सक्षम’ उपक्रम; स्वामी मुक्तानंद हायस्कूलमध्ये डिजिटल क्लासरूम व संगणक संचाचे लोकार्पण
लायन्स क्लब ऑफ मुंबई सॅफ्रॉनच्या अंतर्गत ‘प्रोजेक्ट सक्षम’ उपक्रम; स्वामी मुक्तानंद हायस्कूलमध्ये डिजिटल क्लासरूम व संगणक संचाचे लोकार्पण
मुंबई, चेंबूर (प्रतिनिधी) :
विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत त्यांना भविष्यातील स्पर्धात्मक जगासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ मुंबई सॅफ्रॉनच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट सक्षम’ या महत्त्वाकांक्षी सामाजिक उपक्रमांतर्गत स्वामी मुक्तानंद हायस्कूल, सुभाषनगर (चेंबूर) येथे डिजिटल (स्मार्ट बोर्ड) क्लासरूम व संगणक संचाचे लोकार्पण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
शुक्रवार, दि. १७ जुलै २०२६ रोजी झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३१-ए१, लायन्स क्लब ऑफ मुंबई सॅफ्रॉन आणि हंसराज दामोदर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. बदलत्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून गुणवत्तापूर्ण, संवादात्मक आणि आधुनिक शिक्षण मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम साकारण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३१-ए१चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन पवन के. अग्रवाल उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, सामाजिक जाणीव आणि जबाबदार नागरिक म्हणून घडण्याचे मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केवळ करिअरसाठी नव्हे, तर समाजहितासाठी आणि ज्ञानवृद्धीसाठी करावा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
यावेळी हंसराज दामोदर चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त पीयूष जेसराणी, लायन्स क्लब ऑफ मुंबई सॅफ्रॉनचे एक्स्टेंशन चेअरमन लायन विजय रायमने, लायन मोहन वायदंडे, क्लबचे अध्यक्ष लायन जितेंद्र दगडूदादा सकपाळ तसेच प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर लायन वीणा दोरवणकर यांनी ‘प्रोजेक्ट सक्षम’ची संकल्पना आणि उद्दिष्टे स्पष्ट केली. डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील स्पर्धेसाठी सक्षम बनविणे, त्यांच्यात तांत्रिक कौशल्य विकसित करणे आणि शिक्षण अधिक प्रभावी व दर्जेदार करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.
शाळेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष एकनाथ आव्हाडकर यांनी आयोजकांचे आभार मानत, शाळेला मिळालेल्या डिजिटल क्लासरूम आणि संगणक संचामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत निश्चितच सकारात्मक बदल होईल, असा विश्वास व्यक्त केला. आधुनिक साधनसामग्रीमुळे अध्यापन अधिक परिणामकारक होईल आणि विद्यार्थ्यांचा अभ्यासातील सहभागही वाढेल, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास लायन भाग्यश्री वर्तक, लायन नितीन पन्हाळकर, लायन सचिन राऊत, लायन नीरजा सकपाळ, सुषमा सकपाळ राऊत, राजेश जैन, तसेच शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात डिजिटल शिक्षणाच्या वाढत्या गरजेवर विशेष भर देण्यात आला. स्मार्ट बोर्ड, संगणक आणि तंत्रज्ञानाधारित अध्यापनामुळे विद्यार्थ्यांचे आकलन अधिक प्रभावी होणार असून त्यांच्या ज्ञानार्जनाची गुणवत्ता वाढण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांमधील डिजिटल दरी कमी करण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची आवश्यकता असल्याचेही मान्यवरांनी अधोरेखित केले.
'प्रोजेक्ट सक्षम' हा केवळ शाळेला डिजिटल साधनसामग्री उपलब्ध करून देणारा उपक्रम नसून, विद्यार्थ्यांना आधुनिक युगातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम बनविणारा आणि शिक्षण क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडविणारा सामाजिक उपक्रम असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. शिक्षण, तंत्रज्ञान आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.
Comments
Post a Comment