जागतिक वारसा प्रतापगडाच्या संवर्धनाला नवी दिशा; १२७ कोटींच्या विकास आराखड्याला गती, ऐतिहासिक वैभव अबाधित ठेवण्यावर भर
जागतिक वारसा प्रतापगडाच्या संवर्धनाला नवी दिशा; १२७ कोटींच्या विकास आराखड्याला गती, ऐतिहासिक वैभव अबाधित ठेवण्यावर भर
सातारा, दि. १३ (प्रतिनिधी) :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि दूरदृष्टीचे गौरवशाली प्रतीक असलेल्या किल्ले प्रतापगडाच्या सर्वांगीण विकास व संवर्धनासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाची महत्त्वपूर्ण बैठक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत प्रतापगडाचा ऐतिहासिक वारसा जपत पर्यटनविकास, संवर्धन, स्थानिकांना रोजगारनिर्मिती आणि पर्यटकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस प्राधिकरणाचे सह-अध्यक्ष तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, पुरातत्त्व विभागाचे सहसंचालक डॉ. विलास वाहने, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, तसेच प्राधिकरणाचे अशासकीय सदस्य मिलिंद एकबोटे, नितीन शिंदे, शरद पोंक्षे, सदाशिव टेंटविलकर, सोमनाथ धुमाळ, चंद्रकांत पाटील, विजय नायडू, अमोल जाधव, पंकज चव्हाण आदी उपस्थित होते.
प्रतापगड हा जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झाल्यानंतर त्याच्या संवर्धनासाठी शासनाने १२७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून किल्ल्यावरील विविध संवर्धन व विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत.
यावेळी अध्यक्ष खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट निर्देश देताना सांगितले की, "प्रतापगडाचे ऐतिहासिक स्वरूप अबाधित ठेवणे हीच सर्वोच्च प्राथमिकता आहे. विकासकामे करताना किल्ल्याच्या मूळ रचनेत कोणताही बदल होणार नाही, याची विशेष काळजी घेत संवर्धनाची कामे केली पाहिजेत."
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही प्रतापगडाच्या ऐतिहासिक महत्त्वावर भर देत सांगितले की, "छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला हा किल्ला गेली चारशे वर्षे अभेद्य उभा आहे. आज आपण करत असलेले जतन आणि संवर्धनही पुढील अनेक शतकांपर्यंत टिकेल, अशा दर्जाचे असले पाहिजे."
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी प्रतापगडाशी निगडित ऐतिहासिक स्थळांचा विकास आराखड्यात समावेश करण्याची सूचना केली. शिवकाळात पार येथे असलेल्या ऐतिहासिक बाजारपेठेचा विकास, तसेच प्रतापगडाशी संबंधित इतर ऐतिहासिक ठिकाणांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यावर त्यांनी भर दिला.
बैठकीत प्रतापगडाच्या विकासासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग दर्शविणारी भित्तीचित्रे उभारणे, लाईट अँड साऊंड शो सुरू करणे, त्यासाठी इतिहास अभ्यासकांकडून स्क्रिप्ट तयार करून सांस्कृतिक विभागाची मान्यता घेणे, स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी डोलीची व्यवस्था, किल्ल्यावरील तीन प्राचीन तलावांचे उत्खनन, गाळ काढून पुनर्जीवन, सर्व विकासकामांचे थर्ड पार्टी ऑडिट, शिवरायांच्या दैनंदिन कामकाजाच्या ठिकाणी ऐतिहासिक सदर उभारण्याचा प्रस्ताव, तसेच किल्ल्यावरील मंदिरांचे स्वरूप चारशे वर्षांपूर्वीप्रमाणे जतन करण्याचे नियोजन अशा विविध विषयांवर सखोल विचारविनिमय करण्यात आला.
बैठकीत प्रतापगडाचा ऐतिहासिक वारसा जपत आधुनिक पर्यटन सुविधा उभारणे, पर्यटकांचा अनुभव अधिक समृद्ध करणे आणि स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे या उद्दिष्टांवर एकमत झाले. त्यामुळे आगामी काळात प्रतापगडाच्या संवर्धन आणि पर्यटन विकासाला अधिक गती मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत या बैठकीतून मिळाले.
Comments
Post a Comment