पेटती चिता महापुरात वाहून गेली! पालकमंत्र्यांच्या तालुक्यातील ढोरोशीतील हृदयद्रावक घटना; अंत्यसंस्कारही अपूर्ण ...


पेटती चिता महापुरात वाहून गेली! पालकमंत्र्यांच्या तालुक्यातील ढोरोशीतील हृदयद्रावक घटना; अंत्यसंस्कारही अपूर्ण ...

पाटण प्रतिनिधी : 

मुसळधार पावसाने सातारा जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले असतानाच पाटण तालुक्यातील ढोरोशी गावात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. जिवंतपणी मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करणाऱ्या ग्रामीण नागरिकांना मृत्यूनंतरही सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याचा हक्क मिळत नसल्याचे विदारक वास्तव या घटनेतून समोर आले आहे. एका ज्येष्ठ नागरिकाची पेटती चिता ओढ्याच्या महापुरात वाहून गेल्याने अंत्यसंस्कार अपूर्ण राहिले, तर अस्थी संकलनासाठी राखही शिल्लक उरली नाही. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ढोरोशी (ता. पाटण) येथील ज्येष्ठ नागरिक कै. साहेबराव मारुती मुळीक यांचे निधन झाल्यानंतर गावालगतच्या ओढ्याशेजारी असलेल्या तात्पुरत्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरू होते. नातेवाईक, ग्रामस्थ आणि आप्तस्वकीयांच्या उपस्थितीत मुलाने वडिलांना मुखाग्नी दिला. चितेने नुकताच पेट घेतला असतानाच परिसरात मुसळधार पावसाने जोर धरला आणि काही क्षणांतच ओढ्याला महापूर आला.

पाण्याचा प्रवाह एवढा प्रचंड होता की, चिता पूर्णपणे पाण्याखाली गेली. पेटती चिता विझली आणि अर्धवट जळालेले पार्थिव तसेच चितेवरील लाकडे पुराच्या पाण्यासोबत वाहून गेली. हा धक्कादायक प्रसंग उपस्थित ग्रामस्थांनी असहायपणे पाहिला. पुराच्या प्रचंड वेगामुळे कोणालाही पुढे जाऊन काहीच करता आले नाही.

या घटनेमुळे मुळीक कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, धार्मिक परंपरेनुसार पूर्ण अंत्यसंस्कार आणि त्यानंतरचे विधी करण्यासाठी आवश्यक असलेल्या अस्थीदेखील उपलब्ध राहिल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांवर मोठे मानसिक आघात झाले आहेत.

ढोरोशीसह परिसरातील अनेक गावांमध्ये अद्याप सुरक्षित आणि कायमस्वरूपी स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध नसल्याची बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. पावसाळ्यात ओढे-नाले दुथडी भरून वाहत असताना अशा ठिकाणी अंत्यसंस्कार करावे लागत असल्याने भविष्यात अशा दुर्घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे ही घटना सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्यात घडल्याने या प्रश्नाकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे. ग्रामीण भागातील स्मशानभूमींचे संरक्षण, पूररोधक व्यवस्था आणि आवश्यक पायाभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.

दरम्यान, या अत्यंत वेदनादायी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, मृत्यूनंतरही माणसाला सन्मानाने निरोप देता यावा यासाठी ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांकडे शासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl