पहिल्याच पावसात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा रस्ता उखडला; घोणसपूर ग्रामस्थांचा संतापनिकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी, कंत्राटदारावर कारवाई आणि तातडीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी


पहिल्याच पावसात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा रस्ता उखडला; घोणसपूर ग्रामस्थांचा संताप

निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी, कंत्राटदारावर कारवाई आणि तातडीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी

महाबळेश्वर, प्रतिनिधी :
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मोठ्या अपेक्षेने उभारण्यात आलेल्या प्रजमा-२६ ते घोणसपूर (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) या रस्त्याची पहिल्याच पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडणे, डांबरीकरण उखडणे आणि पृष्ठभागाची झपाट्याने झालेली हानी पाहता कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, संबंधित कामाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी शासनाकडे केली आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत RD-SAT(II)-A-256 या पॅकेजमधून सुमारे ४.७५५ किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे काम १० जानेवारी २०२५ रोजी सुरू करण्यात आले होते. हे काम मे. उदय डी. जाधव कन्स्ट्रक्शन, रत्नप्रभा कन्स्ट्रक्शन व मंगलश्याम कन्स्ट्रक्शन (जे.व्ही.), वाई, जि. सातारा यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले आहे.

मात्र जुलै २०२६ मध्ये झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसानंतर रस्त्याची अनेक ठिकाणी दुरवस्था झाल्याचे समोर आले आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. काही ठिकाणी डांबरीकरण पूर्णपणे उखडून खडी बाहेर आली असून रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे या कामात दर्जेदार साहित्याचा वापर झाला होता का, तसेच बांधकामाची गुणवत्ता योग्य होती का, याबाबत ग्रामस्थांनी शंका व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे या रस्त्यावरील माहिती फलकावर संबंधित कामासाठी १० वर्षांची देखभाल व हमी असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. असे असताना अवघ्या काही महिन्यांतच रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता ही हमी प्रत्यक्षात कितपत प्रभावी आहे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. शासनाच्या निधीतून कोट्यवधी रुपये खर्च करूनही कामाचा दर्जा टिकत नसेल, तर त्याला जबाबदार कोण, असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

घोणसपूर हे गाव धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. गावातील प्राचीन स्वयंभू शिवालय, शिवकालीन ऐतिहासिक मधू मकरंदगड, तसेच समृद्ध जैवविविधता आणि दुर्मिळ औषधी वनस्पतींमुळे या परिसराला वर्षभर भाविक, गडभ्रमंती करणारे ट्रेकर्स आणि देश-विदेशातील पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे या रस्त्याची स्थिती केवळ स्थानिकांसाठीच नव्हे, तर पर्यटन विकासासाठीही महत्त्वाची आहे.

गावातील बहुतांश नागरिक शेतीवर अवलंबून असून दैनंदिन व्यवहार, शेतीमालाची वाहतूक, शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास आणि रुग्णांची ने-आण यासाठी हाच मुख्य मार्ग आहे. अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर आमदार श्री. मकरंद आबा पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हा रस्ता मंजूर झाला होता. त्यामुळे गावकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा या रस्त्याशी जोडल्या गेल्या होत्या. मात्र पहिल्याच पावसात रस्ता खराब झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र निराशा पसरली आहे.

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी आणि गंभीर रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी रुग्णांना डोलीच्या साहाय्याने उपचारासाठी नेण्याची वेळ येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. खराब रस्त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून आपत्कालीन सेवांनाही अडथळे निर्माण होत आहेत.

ग्रामस्थांनी शासनाकडे या कामाची स्वतंत्र उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करण्याची, निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याची, कंत्राटातील हमी अटींनुसार तातडीने दर्जेदार दुरुस्ती करण्याची आणि भविष्यात अशा प्रकारच्या कामांवर प्रभावी देखरेख ठेवण्याची मागणी केली आहे.

याशिवाय मा. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ संभाजी शिंदे यांनी घोणसपूर गावाचे धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या असलेले महत्त्व लक्षात घेऊन संबंधित विभागांना तातडीने रस्त्याची पाहणी करून आवश्यक दुरुस्तीचे निर्देश द्यावेत, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

ग्रामस्थांच्या मते, विकासकामांचा खरा उद्देश नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील या रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई आणि दर्जेदार दुरुस्ती होणे ही काळाची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl