आर्थर सीट मार्गावर नागपूरच्या पर्यटकांची बस चिखलात रुतली; सहा तासांच्या शर्थीच्या बचावमोहीमेनंतर सर्व पर्यटक सुखरूप
आर्थर सीट मार्गावर नागपूरच्या पर्यटकांची बस चिखलात रुतली; सहा तासांच्या शर्थीच्या बचावमोहीमेनंतर सर्व पर्यटक सुखरूप
महाबळेश्वर | प्रतिनिधी
सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर परिसरातील रस्त्यांची स्थिती बिकट झाली असून, शुक्रवारी आर्थर सीट पॉईंटकडे जाणाऱ्या मार्गावर नागपूरहून आलेल्या पर्यटकांची बस चिखलात खोलवर रुतल्याची घटना घडली. बसमध्ये असलेल्या पर्यटकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, स्थानिक प्रशासन, पोलीस, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे तब्बल सहा तास चाललेल्या अथक बचावकार्यानंतर बस सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनील शिंदे, महाबळेश्वर ट्रेकर्सचे बाबा भाटिया, महाबळेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील, महाबळेश्वर पोलीस दलातील आकाश दळवी, सतीश साळुंखे, अमित कोळी तसेच जीसीपी ऑपरेटर अविनाश शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याशिवाय अनेक स्थानिक युवकांनीही स्वयंप्रेरणेने मदतकार्यामध्ये सहभाग घेत बचावकार्य अधिक वेगाने पूर्ण करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.
प्राथमिक टप्प्यात बसचे चालक, वाहक आणि स्थानिक नागरिकांनी बस चिखलातून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र, सततच्या पावसामुळे रस्ता पूर्णपणे निसरडा झाला होता आणि बसची चाके खोल चिखलात रुतल्याने हे प्रयत्न अपयशी ठरले. त्यानंतर नगरपालिकेची यंत्रणा आणि जीसीपी मशीनच्या सहाय्याने संयुक्तरित्या बचावमोहीम हाती घेण्यात आली.
दरम्यान, घटनास्थळी मोबाईल नेटवर्क वारंवार खंडित होत असल्यामुळे आपत्कालीन यंत्रणांशी संपर्क साधण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे आवश्यक यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ वेळेत पोहोचविण्यात काहीसा विलंब झाला. तरीही उपस्थित सर्वांनी संयम राखत सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले.
सुमारे सहा तासांच्या अथक परिश्रमानंतर रात्री उशिरा बस सुरक्षितपणे चिखलातून बाहेर काढण्यात यश आले. बसमधील सर्व पर्यटक सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
यशस्वी बचावकार्यानंतर नागपूरहून आलेल्या पर्यटकांनी श्रीक्षेत्र महाबळेश्वरचे ग्रामस्थ, स्थानिक युवक, महाबळेश्वर नगरपालिका प्रशासन, महाबळेश्वर पोलीस दल आणि महाबळेश्वर ट्रेकर्स यांच्या तत्पर मदतीबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. संकटाच्या प्रसंगी स्थानिकांनी दाखविलेली एकजूट, तत्परता आणि मानवतेची भावना पर्यटकांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सतत सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर चिखल, घसरण आणि दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे पर्यटकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून वाहन चालविताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment