"महिनाभरातच स्मशानभूमीच्या शेडला तडे; नदीपात्रातील बांधकामावर ग्रामस्थांचा संताप, चौकशीची मागणी"

"महिनाभरातच स्मशानभूमीच्या शेडला तडे; नदीपात्रातील बांधकामावर ग्रामस्थांचा संताप, चौकशीची मागणी"

प्रतापगड प्रतिनिधी :

महाबळेश्वर तालुक्यातील गोरोशी गावात नुकतेच पूर्ण झालेल्या स्मशानभूमीच्या शेडच्या निकृष्ट बांधकामाचा प्रकार समोर आला आहे. अवघ्या महिनाभरापूर्वी पूर्ण झालेले हे शेड पहिल्याच मोठ्या पावसात तडकल्याने बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, हे शेड नदीपात्रालगत आणि पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात उभारण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
मागील आठवड्यात महाबळेश्वर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीला मोठा पूर आला. पाण्याचा वेग वाढल्याने स्मशानभूमीचे शेड पूर्णपणे पाण्याखाली गेले. पूर ओसरल्यानंतर शेडच्या खांबांना, भिंतींना  मोठमोठे तडे गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हे बांधकाम सुरक्षित राहिले नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, शेड उभारताना जागेची योग्य निवड करण्यात आलेली नाही. नदीच्या प्रवाहाचा विचार न करता पाण्याच्या मार्गातच बांधकाम करण्यात आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच दर्जाहीन साहित्य आणि निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.

स्मशानभूमी ही गावातील अत्यंत महत्त्वाची सार्वजनिक सुविधा असून, अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. पावसाळ्याच्या काळात या शेडचा वापर करणे धोकादायक ठरू शकते, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

"करदात्यांच्या पैशातून उभारण्यात आलेले सार्वजनिक बांधकाम अवघ्या एका महिन्यात तडे जाते, ही अत्यंत गंभीर बाब आहे. यामागील दोषी अधिकारी, अभियंते आणि संबंधित ठेकेदार यांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी," अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

तसेच, नदीपात्रात बांधकाम करण्यास कोणी परवानगी दिली, जागेची निवड कोणाच्या शिफारशीवर झाली, तांत्रिक तपासणी झाली होती का, याचीही सखोल चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे सार्वजनिक कामांच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून, संबंधित विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून तांत्रिक अहवाल सादर करावा, शेड सुरक्षित नसल्यास त्याचे पुनर्बांधकाम करावे आणि भविष्यात अशा प्रकारची निष्काळजीपणा होणार नाही यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गोरोशी ग्रामस्थांनी केली आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl