कांदाटी खोऱ्यावर जलप्रलयाचे सावट! दरेगाव पुढील तब्बल १६ गावांचा संपर्क तुटला; शेकडो एकर शेती वाहून, हजारो नागरिक संकटात
कांदाटी खोऱ्यावर जलप्रलयाचे सावट! दरेगाव पुढील तब्बल १६ गावांचा संपर्क तुटला; शेकडो एकर शेती वाहून, हजारो नागरिक संकटात
प्रतापगड प्रतिनिधी :
सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आता भीषण रूप धारण केले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मूळ गाव दरेगावपुढील कांदाटी खोऱ्यात अभूतपूर्व आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दरडी कोसळणे, प्रचंड आकाराची झाडे उन्मळून पडणे, रस्ते वाहून जाणे आणि पूल खचणे अशा घटना सातत्याने घडत आहेत. परिणामी दरेगावपुढील तब्बल १६ गावांचा बाह्य जगाशी संपर्क पूर्णपणे तुटला असून हजारो नागरिक अक्षरशः संकटात सापडले आहेत.
या गावांमधील रस्ते अनेक ठिकाणी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत, तर काही ठिकाणी मोठ्या दरडी कोसळल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. काही पुलांना तडे जाऊन ते खचल्याने कोणत्याही प्रकारच्या वाहनांची ये-जा बंद झाली आहे. त्यामुळे रुग्णवाहिका, शालेय वाहने, दूध व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तसेच आरोग्य सेवा पूर्णपणे विस्कळीत झाल्या आहेत. अनेक गावांमध्ये नागरिकांना चार दिवसांपासून घराबाहेर पडणेही अशक्य झाले आहे.
अतिवृष्टीमुळे वीज वितरण यंत्रणेलाही मोठा फटका बसला असून अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. मोबाईल नेटवर्कही ठप्प झाल्याने नागरिकांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत मदत मागविणे किंवा नातेवाईकांशी संपर्क साधणेही अशक्य झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सततच्या पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. कांदाटी खोऱ्यातील शेकडो एकर भातशेती पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेली असून अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. काही ठिकाणी सुपीक मातीच वाहून गेल्याने शेतीचे स्वरूप बदलून गेले आहे. यंदाच्या खरीप हंगामावर याचा गंभीर परिणाम होणार असून शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
दरम्यान, मुंबईहून आपल्या मूळ गावी आलेले अनेक चाकरमानी तसेच पुणे, मुंबई आणि इतर भागांतून पर्यटनासाठी आलेले पर्यटकही या परिसरात अडकून पडल्याची माहिती समोर येत आहे. संपर्क व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी अन्नधान्य व इतर अत्यावश्यक वस्तूंचाही तुटवडा जाणवू लागल्याचे स्थानिकांनी सांगितले.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करावे, संपर्क तुटलेले रस्ते तातडीने वाहतुकीसाठी खुले करावेत, खंडित वीजपुरवठा व मोबाईल सेवा पूर्ववत कराव्यात, अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवावे तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
हवामान विभागाने पुढील २४ तासांतही अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे कांदाटी खोऱ्यातील नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे. दरडी कोसळण्याचा धोका अद्याप कायम असून प्रशासनाने तातडीने यंत्रणा सक्रिय करून संपर्क तुटलेल्या १६ गावांपर्यंत मदत पोहोचवावी, अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
Comments
Post a Comment