कर्नाटकातील शेकडो शेतकऱ्यांची महाबळेश्वरमध्ये कृष्णामातेस कृतज्ञतेची वंदना विजयपूर–बागलकोटच्या शेतकऱ्यांकडून पंचगंगा मंदिरात गंगापूजा व 'बागीना' अर्पण; २५ वर्षांची परंपरा कायम

कर्नाटकातील शेकडो शेतकऱ्यांची महाबळेश्वरमध्ये कृष्णामातेस कृतज्ञतेची वंदना

विजयपूर–बागलकोटच्या शेतकऱ्यांकडून पंचगंगा मंदिरात गंगापूजा व 'बागीना' अर्पण; २५ वर्षांची परंपरा कायम

महाबळेश्वर प्रतिनिधी :

कृष्णा नदी ही महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील लाखो शेतकरी कुटुंबांची जीवनदायिनी मानली जाते. या पवित्र नदीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उत्तर कर्नाटकातील विजयपूर व बागलकोट जिल्ह्यातील शेकडो शेतकरी, महिला व भाविकांनी गुरुवारी महाबळेश्वर येथील पंचगंगा मंदिरात विशेष गंगापूजा करून कृष्णामातेला 'बागीना' अर्पण केला.


कड्डिगर हुण्णिमे (पावसाळ्यातील पारंपरिक सण) निमित्त आयोजित या धार्मिक सोहळ्याचे नेतृत्व कर्नाटकचे माजी मंत्री एस. के. बेळ्ळब्बी यांनी केले. पंचगंगा मंदिरातील उद्भव लिंग आणि कृष्णामातेच्या मूर्तीला मंत्रोच्चारात जलाभिषेक करून शास्त्रोक्त विधीने पूजा करण्यात आली. महिलांनी पारंपरिक पद्धतीने कृष्णामातेची ओटी भरून तिचा सन्मान केला.

यावेळी बोलताना एस. के. बेळ्ळब्बी म्हणाले की, "कृष्णा नदीने लाखो एकर शेतीला आणि असंख्य जीवांना वर्षानुवर्षे जीवन दिले आहे. तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. महाबळेश्वर परिसरात भरपूर पाऊस झाल्यास कृष्णा नदी तुडुंब भरते आणि महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा तसेच आंध्र प्रदेशातील शेतीला मोठा आधार मिळतो."

भाजप जिल्हाध्यक्ष गुरुसंगप्पा अंगडी यांनी सांगितले की, गेल्या पंचवीस वर्षांपासून एस. के. बेळ्ळब्बी यांच्या पुढाकारातून ही परंपरा अखंड सुरू असून, तरुण पिढीनेही हा सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक वारसा जपावा.

महाबळेश्वर हे केवळ कृष्णा नदीचेच नव्हे, तर गायत्री, सावित्री, कोयना आणि वेण्णा या नद्यांचेही उगमस्थान आहे. या नद्यांच्या पाण्यावर दक्षिण भारतातील अनेक जिल्ह्यांची शेती आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळे पंचगंगा मंदिराला धार्मिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या सोहळ्यास कोळ्ळार शीलवंत हिरेमठचे कैलासनाथ शिवाचार्य, दिगंबरेश्वर मठाचे कलिनाथ देवरू, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष डी. बी. बिरादार, तसेच रामण्णा बाटी, विजय पुजारी, श्रीशैल वडगल्ल, अशोक गिड्डप्परगोल, कबीर गाणगेर, आनंद बिस्तगोळ, इरप्पा जिद्दिबागाल, मुत्तु तेली, कस्तुरी बेळ्ळब्बी, रेणुका अथणी यांच्यासह विजयपूर, बळबट्टी, हणमापूर, मट्टीहाळ, उपळदिन्नी, मसूती आदी गावांतील शेकडो शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महाबळेश्वरच्या वतीने सरपंच सुनील बिरामणे, पंचगंगा मंदिराचे पुजारी व माजी सरपंच दिलीप लांगी, नाना वाडेकर, प्रदीप कात्रट, राजेंद्र पुजारी, महाबळेश्वर अर्बन बँकेचे संचालक प्रशांत कात्रट, महंतेश हिरेमठ, बसप्पा कोळमट्टी, शशिकांत पाटील, टिपण्णा हुग्गी, रमेश हूगार, परशुराम कोंगुत्ती यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

विशेष म्हणजे, पूर्वी केवळ कड्डिगर हुण्णिमेच्या दिवशीच कृष्णामातेला बागीना अर्पण करण्याची परंपरा होती. मात्र, आता उत्तर कर्नाटकातील विविध भागांतील शेतकरी दरवर्षी महाबळेश्वर येथे येऊन कृष्णामातेप्रती कृतज्ञता व्यक्त करत ही परंपरा अधिक व्यापक स्वरूपात जपत आहेत.

विशेष चौकट

कृष्णा नदी : चार राज्यांची जीवनवाहिनी

महाबळेश्वर येथून उगम पावणारी कृष्णा नदी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील लाखो शेतकरी कुटुंबांसाठी जीवनरेषा मानली जाते. या नदीच्या पाण्यावर शेती, पिण्याचे पाणी आणि अनेक धरणांची व्यवस्था अवलंबून असल्याने दरवर्षी उत्तर कर्नाटकातील शेतकरी महाबळेश्वर येथे येऊन कृष्णामातेची महापूजा करून कृतज्ञता व्यक्त करतात.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl