"पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी महाबळेश्वर पोलिसांचा टॅक्सी चालकांना इशारा; नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई"


"पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी महाबळेश्वर पोलिसांचा टॅक्सी चालकांना इशारा; नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई"

महाबळेश्वर प्रतिनिधी :

पावसाळी पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी महाबळेश्वर पोलीस ठाण्याच्या वतीने टॅक्सी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची, टॅक्सी चालक व मालकांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत पर्यटकांच्या सुरक्षिततेसह वाहतूक शिस्त आणि टॅक्सी व्यवसायातील नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

दि. 10 जुलै 2026 रोजी सकाळी 11.25 ते 12.20 या वेळेत महाबळेश्वर पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीचे मार्गदर्शन पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांनी केले. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक महाबळेश्वरला भेट देत असल्याने कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सर्व चालकांनी जबाबदारीने वागण्याचे आवाहन करण्यात आले.

बैठकीत विनापरवाना (परमिट) टॅक्सी चालविण्यास सक्त मनाई करण्यात आली. तसेच नगरपालिकेने निश्चित करून दिलेल्या संख्येनुसारच टॅक्सी स्टँडवर वाहनांचे पार्किंग करावे, अतिरिक्त वाहन उभी करू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले.

याशिवाय टॅक्सी व्यवसाय हा निश्चित करण्यात आलेल्या क्रमांकानुसारच करावा, चालकांनी निर्धारित ड्रेस कोडचे पालन करावे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन उभे करू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या.

पावसाळ्यात धबधबे, दऱ्या आणि कड्यांजवळ अपघाताचा धोका वाढत असल्याने चालकांनी पर्यटकांना धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, तसेच जीव धोक्यात घालून सेल्फी किंवा छायाचित्रे काढू नयेत, याबाबत जागरूक करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या.

यासोबतच परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ महाबळेश्वर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले.

बैठकीच्या शेवटी पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले की, महाबळेश्वर पोलीस ठाण्याकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन न करणाऱ्या चालकांवर व वाहनमालकांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.

पावसाळी पर्यटन हंगामात पर्यटकांची सुरक्षितता, वाहतुकीतील शिस्त आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने घेतलेल्या या बैठकीला टॅक्सी संघटनांचे पदाधिकारी, चालक व वाहनमालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl