महाबळेश्वर–तापोळा मार्गाच्या दुरुस्तीची मागणी तीव्र; 'काम न झाल्यास १०५ गावांचा तीव्र आंदोलनाचा इशारा'आराम चौक ते कारवी आळा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था; मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या सूचनांनंतरही प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप

महाबळेश्वर–तापोळा मार्गाच्या दुरुस्तीची मागणी तीव्र; 'काम न झाल्यास १०५ गावांचा तीव्र आंदोलनाचा इशारा'

आराम चौक ते कारवी आळा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था; मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या सूचनांनंतरही प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप

महाबळेश्वर : प्रतिनिधी

महाबळेश्वर–तापोळा हा १०५ गावांसाठी जीवनवाहिनी मानला जाणारा प्रमुख दळणवळण मार्ग असून, या मार्गावरील आराम चौक ते कारवी आळा दरम्यानच्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मांघर गावचे सरपंच गणेश जाधव यांनी प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप करत, रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास १०५ गाव समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांनी या परिसराला भेट दिली होती. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्या सूचनांनंतरही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

सध्या पावसामुळे रस्त्याची अधिकच दुरवस्था झाली असून, मोठे खड्डे, उखडलेला डांबरी थर आणि पाण्याने भरलेले खाच-खळगे यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दुचाकीस्वार, शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही या मार्गावरून जाताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

महाबळेश्वर–तापोळा मार्ग हा केवळ स्थानिक नागरिकांसाठीच नव्हे, तर पर्यटनाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा आहे. तापोळा परिसरात दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येत असल्याने या रस्त्याची चांगली स्थिती असणे आवश्यक आहे. मात्र, सध्याच्या दुरवस्थेमुळे पर्यटनावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरपंच गणेश जाधव यांनी प्रशासनाला आवाहन करताना सांगितले की, "रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा. अन्यथा १०५ गाव समाजाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील."

स्थानिक नागरिकांनीही रस्त्याची केवळ तात्पुरती डागडुजी न करता, दर्जेदार आणि कायमस्वरूपी पुनर्बांधणी करण्याची मागणी केली आहे. तसेच पावसाळ्यात वारंवार निर्माण होणाऱ्या समस्यांवर दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे.

महाबळेश्वर–तापोळा मार्ग हा १०५ गावांच्या दैनंदिन जीवनाचा आधार असल्याने प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने काम सुरू करावे, अशी एकमुखी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl