महाबळेश्वर तालुक्यातील विवर गावावर भू-स्खलनाचे मोठे संकट; चार किलोमीटर परिसरातील जमिनीला तडे, प्रशासनाच्या तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी
महाबळेश्वर तालुक्यातील विवर गावावर भू-स्खलनाचे मोठे संकट; चार किलोमीटर परिसरातील जमिनीला तडे, प्रशासनाच्या तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी
महाबळेश्वर प्रतिनिधी :
मागील आठवड्यात महाबळेश्वर तालुक्यात झालेल्या विक्रमी अतिवृष्टीनंतर आता विवर गावावर भू-स्खलनाचे गंभीर संकट ओढावले आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे गाव परिसरातील मोठ्या प्रमाणावर शेतजमीन खचली असून अनेक ठिकाणी जमिनीला मोठमोठे तडे गेले आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावातील शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, विवर गावाच्या परिसरात जवळपास चार किलोमीटर अंतरापर्यंत जमिनीला लांबच लांब चिरा पडल्या असून काही ठिकाणी रस्तादेखील खचला आहे. रस्त्यावर मोठे तडे पडल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला असून परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भू-स्खलनाच्या धोक्यामुळे शेतजमिनींचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जमिनी सरकल्याने शेतीचे नुकसान झाले असून भविष्यात आणखी जमीन खचण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. याचा परिणाम शेतीबरोबरच गावातील दळणवळण व्यवस्थेवरही होऊ शकतो.
ग्रामस्थांनी प्रशासनाला तातडीने घटनास्थळी भेट देऊन भूगर्भ तज्ज्ञांकडून सविस्तर पाहणी करण्याची मागणी केली आहे. तसेच परिस्थिती धोकादायक असल्याचे निष्पन्न झाल्यास नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आणि गरज भासल्यास सुरक्षित ठिकाणी पुनर्वसनाचे नियोजन करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
महाबळेश्वर तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये भूस्खलन, रस्ते खचणे, शेतीचे नुकसान आणि संपर्क व्यवस्था विस्कळीत होण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितीत विवर गावातील वाढता भू-स्खलनाचा धोका लक्षात घेता प्रशासनाने तातडीने दखल घेऊन योग्य उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment