डोंगरात भूस्खलन; देवसरे गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनचे नुकसान, मात्र नागरी वस्ती सुरक्षित
डोंगरात भूस्खलन; देवसरे गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनचे नुकसान, मात्र नागरी वस्ती सुरक्षित
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता ग्रामीण भागालाही बसू लागला आहे. तालुक्यातील देवसरे गावाच्या वरच्या डोंगरभागात भूस्खलन झाल्याने पिण्याच्या पाण्याच्या मुख्य पाइपलाइनचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे गावाच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून संबंधित यंत्रणा दुरुस्तीच्या कामासाठी सज्ज झाली आहे.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे डोंगराचा काही भाग खचून खाली आल्याने पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन तुटली. त्यामुळे काही काळासाठी पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नुकसानग्रस्त ठिकाणी पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली.
दरम्यान, भूस्खलनाची घटना डोंगराच्या वरच्या भागात घडली असली तरी देवसरे गावातील नागरी वस्तीला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने डोंगराळ भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज असून, संभाव्य भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने नजर ठेवली जात असून आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.
Comments
Post a Comment