महाबळेश्वर तालुक्यात चिखली शाळेची उज्ज्वल कामगिरी! पाचवीत तालुक्यात प्रथम, आठवीतही शिष्यवृत्तीचे घवघवीत यश

महाबळेश्वर तालुक्यात चिखली शाळेची उज्ज्वल कामगिरी! पाचवीत तालुक्यात प्रथम, आठवीतही शिष्यवृत्तीचे घवघवीत यश

महाबळेश्वर प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ च्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिखलीने उल्लेखनीय यश संपादन करत पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. शाळेतील इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या दोन विद्यार्थिनी शिष्यवृत्तीधारक ठरल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी स्वरा मंगेश सुर्वे हिने उत्कृष्ट यश मिळवत महाबळेश्वर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच जिल्हा गुणवत्ता यादीत ५९ वा क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. दुसरीकडे, इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत निलम सुनिल ढेबे हिने तालुका गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक मिळवत शिष्यवृत्ती प्राप्त केली.

या दोन्ही विद्यार्थिनींच्या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक विष्णू ढेबे तसेच उपशिक्षक महेश पवार आणि सचिन जगताप यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे यश असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिखली ही शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा तसेच सैनिक स्कूल प्रवेश परीक्षांमध्ये सातत्याने उल्लेखनीय यश संपादन करणारी शाळा म्हणून ओळख निर्माण करत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा राबवत असलेल्या उपक्रमांचे हे फलित मानले जात आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल गटविकास अधिकारी विजय विभुते, गटशिक्षण अधिकारी हर्षवर्धन मोरे, केंद्रप्रमुख चंद्रकांत जंगम, दगडू ढेबे, संजय पार्टे, विनायक पवार, सरपंच दिपाली पवार, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा लता जाधव, संतोष जाधव, संपत जाधव, कोंडिबा जाधव, संतोष मोरे तसेच ग्रामस्थ आणि पालकांनी यशस्वी विद्यार्थिनी, शिक्षक व शाळेचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl