मुसळधार पावसाने सातारा जिल्हा झोडपला! महाबळेश्वर महसूल मंडळात तब्बल ३९३ मि.मी. पाऊस; महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण ३४ टक्के भरले


मुसळधार पावसाने सातारा जिल्हा झोडपला! महाबळेश्वर महसूल मंडळात तब्बल ३९३ मि.मी. पाऊस; महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण ३४ टक्के भरले

सातारा प्रतिनिधी :

सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नद्या, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. या पावसाचा सर्वाधिक लाभ जिल्ह्यातील धरणसाठ्यांना झाला असून महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. ७ जुलै रोजी सकाळी १० वाजेपर्यंत कोयना धरणात ३५.७१ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण ३३.९३ टक्के भरले आहे. धरणात सध्या ९३ हजार क्युसेक्स वेगाने पाण्याची आवक सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात ७ जुलैअखेर एकूण २८८.७ मि.मी. सरासरी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील २२ महसूल मंडळांमध्ये ६५ मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला असून महाबळेश्वर महसूल मंडळात सर्वाधिक ३९२.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल लामज, बामणोली आणि तापोळा येथे प्रत्येकी १६९ मि.मी., वाठार येथे १४८.५ मि.मी., पाचगणी येथे १३६.५ मि.मी., करहर व केळघर येथे प्रत्येकी १२४.५ मि.मी., पसरणी येथे ११०.३ मि.मी. आणि पाटण येथे १००.५ मि.मी. पाऊस झाला आहे.

सततच्या पावसामुळे काही गावांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील नावली, धावली आणि रुळे येथील ३२ नागरिक, जावली तालुक्यातील बहुले व बोंडारवाडी येथील ३१ नागरिकांना अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, मंदिरे तसेच नातेवाईकांच्या घरी सुरक्षित हलविण्यात आले आहे.

दरम्यान, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घरांचे नुकसान झाले आहे. पाटण तालुक्यात ३९, सातारा तालुक्यात ९, महाबळेश्वर तालुक्यात ९, जावली तालुक्यात ११, वाई तालुक्यात १३ आणि खंडाळा तालुक्यात २ अशा एकूण ८३ घरांची पडझड झाली असून नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

पावसामुळे सातारा तालुक्यातील केरी येथील प्राथमिक शाळेच्या छतावरील पत्रे उडून नुकसान झाले असून खंडाळा तालुक्यातील मिरजे येथील प्राथमिक शाळा आणि स्मशानभूमीची संरक्षणभिंत कोसळली आहे. तसेच पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धबधबे, पाणी साचणारे सखल भाग आणि धोकादायक पर्यटनस्थळांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्येही समाधानकारक पाणीसाठा वाढला आहे. कोयना धरणात ३३.९३ टक्के, धोममध्ये ४८.८१ टक्के, धोम-बलकवडीमध्ये ५३.१९ टक्के, कण्हेरमध्ये ६२.२८ टक्के, उरमोडीमध्ये ४५.१८ टक्के तर तारळी धरणात २९.५७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

मुसळधार पावसामुळे झाडे कोसळणे, दरडी कोसळणे आणि रस्ते खचण्याच्या घटना वाढत असल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून तातडीने उपाययोजना कराव्यात. दरडप्रवण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यकतेनुसार त्यांचे त्वरित स्थलांतर करावे, तसेच बंद पडलेले रस्ते शक्य तितक्या लवकर वाहतुकीसाठी खुले करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl