थंडगार महाबळेश्वरला पर्यटकांची पसंती; मुसळधार पावसात धबधबे, धुके आणि स्थानिक खाद्यपदार्थांची मेजवानी
थंडगार महाबळेश्वरला पर्यटकांची पसंती; मुसळधार पावसात धबधबे, धुके आणि स्थानिक खाद्यपदार्थांची मेजवानी
महाबळेश्वर प्रतिनिधी :
शनिवार-रविवारच्या सलग सुट्टीचा फायदा घेत हजारो पर्यटकांनी महाबळेश्वरकडे धाव घेतल्याने संपूर्ण पर्यटननगरी गजबजून गेली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वरचा निसर्ग अधिकच खुलून आला असून धुक्याची दुलई, डोंगर-दऱ्यांमधून कोसळणारे असंख्य धबधबे, हिरवाईने नटलेले घाट आणि आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
महाबळेश्वर नगरपरिषदेच्या पर्जन्यमान नोंदीनुसार रविवारी (५ जुलै) सकाळी १९८.२० मि.मी. इतक्या मुसळधार पावसाची नोंद झाली असून यंदाच्या हंगामातील एकूण पर्जन्यमान १२०४.४० मि.मी.वर पोहोचले आहे. या दमदार पावसामुळे परिसरातील सर्व धबधबे दिमाखात कोसळू लागले असून पर्यटकांनी या नैसर्गिक सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला.
धबधब्यांमध्ये चिंब भिजणे, दाट धुक्यातून फेरफटका मारणे, पावसाच्या सरी अंगावर झेलत विविध पर्यटनस्थळांना भेट देणे, अशा अनुभवांनी पर्यटकांचा उत्साह शिगेला पोहोचला. पावसाळी वातावरणात गरमागरम भाजलेला मका, वाफाळलेला चहा, खमंग कांदा भजी, मक्याचे कणीस आणि स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत अनेकांनी आपल्या सहलीची अविस्मरणीय आठवण जपली.
पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे महाबळेश्वर बाजारपेठ, वेण्णा लेक परिसर, विविध पॉइंट्स तसेच स्थानिक हॉटेल्स, लॉज, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या व्यवसायालाही चांगली चालना मिळाली. पावसाळी पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
मात्र, मुसळधार पावसामुळे काही घाटरस्त्यांवर झाडे कोसळणे, दरडी घसरणे आणि वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटनाही घडत असल्याने प्रशासनाने पर्यटकांना सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यंदाच्या पावसाळ्यात महाबळेश्वर पुन्हा एकदा पर्यटकांसाठी आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरत असून, निसर्गाच्या सान्निध्यात पावसाचा खरा आनंद अनुभवण्यासाठी राज्यभरातून पर्यटक मोठ्या संख्येने येथे दाखल होत आहेत.
Comments
Post a Comment