मोकाट कुत्र्यांच्या त्रासाला आळा; महाबळेश्वर नगर परिषदेकडून विशेष कारवाईला सुरुवात
मोकाट कुत्र्यांच्या त्रासाला आळा; महाबळेश्वर नगर परिषदेकडून विशेष कारवाईला सुरुवात
महाबळेश्वर प्रतिनिधी :
शहरामध्ये वाढत्या मोकाट कुत्र्यांच्या संख्येमुळे नागरिक, पर्यटक तसेच वाहनचालकांना होणारा त्रास लक्षात घेऊन महाबळेश्वर नगर परिषदेकडून मोकाट कुत्री पकडण्याच्या विशेष मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत असल्याने नगर प्रशासनाने याबाबत तातडीने पावले उचलली आहेत.
महाबळेश्वर हे राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असल्याने वर्षभर मोठ्या प्रमाणावर पर्यटक येथे भेट देत असतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून शहरातील बाजारपेठ, पर्यटनस्थळे, बसस्थानक परिसर तसेच निवासी भागांमध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत होते. काही ठिकाणी कुत्र्यांच्या कळपांमुळे नागरिकांना भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, तर वाहनांच्या मागे धावणे, रात्रीच्या वेळी भुंकून त्रास देणे तसेच किरकोळ हल्ल्यांच्या घटनाही घडत असल्याच्या तक्रारी नगर परिषदेकडे प्राप्त झाल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनाने संबंधित विभागाच्या माध्यमातून मोकाट कुत्री पकडण्याची मोहीम हाती घेतली असून शहरातील विविध भागांमध्ये टप्प्याटप्प्याने ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. पकडण्यात आलेल्या कुत्र्यांवर नियमानुसार लसीकरण, नसबंदी तसेच आरोग्य तपासणीची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नगर परिषदेकडून राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून शहरातील सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेची भावना अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच नागरिकांनी मोकाट कुत्र्यांबाबत कोणतीही समस्या अथवा तक्रार असल्यास ती नगर परिषदेकडे कळवावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment