घरातील पेटी फोडून सव्वादोन लाखांच्या ऐवजावर डल्ला; गवडी गावातील चोरीने खळबळ
घरातील पेटी फोडून सव्वादोन लाखांच्या ऐवजावर डल्ला; गवडी गावातील चोरीने खळबळ
मेढा | प्रतिनिधी
जावली तालुक्यातील गवडी गावात अज्ञात चोरट्याने घरात शिरून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ११ हजार ९०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश जावजी गंगावणे (वय ५८, मूळ रा. गवडी, ता. जावली, जि. सातारा, सध्या रा. भारतनगर, वाशीनाका, चेंबूर, मुंबई) यांनी मेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार १२ जून २०२६ रोजी रात्री १० वाजल्यापासून ते १३ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरीची घटना घडली.
फिर्यादी यांच्या गवडी येथील राहत्या घरात अज्ञात चोरट्याने शिरकाव करून बेडरूमची चावी उशाजवळ ठेवलेल्या पॅन्टच्या खिशातून चोरून घेतली. त्यानंतर त्या चावीच्या साहाय्याने बेडरूमचे कुलूप उघडून घरातील पत्र्याची पेटी बाहेर काढण्यात आली. ही पेटी गावातील चंद्रकांत धनवडे यांच्या शेतात नेऊन फोडण्यात आल्याचा आरोप फिर्यादींनी केला आहे.
या पेटीत ठेवलेली दोन तोळे वजनाची अंदाजे ८० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन, अडीच तोळे वजनाचे सुमारे १ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे ब्रेसलेट, अर्धा तोळा वजनाची सुमारे २० हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी तसेच ११ हजार ९०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण २ लाख ११ हजार ९०० रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(४) व ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला असून घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गंगावणे करीत आहेत.
गवडी गावात घडलेल्या या धाडसी चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन चोरीचा ऐवज हस्तगत करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment