महाबळेश्वरमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे कोलमडला; मध्यरात्रीच्या वेळापत्रकामुळे नागरिक संतप्त, ‘कामधंदा सोडून पाण्याची वाट पाहायची का?’

महाबळेश्वरमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे कोलमडला; मध्यरात्रीच्या वेळापत्रकामुळे नागरिक संतप्त, ‘कामधंदा सोडून पाण्याची वाट पाहायची का?’

महाबळेश्वर | प्रतिनिधी

पर्यटननगरी महाबळेश्वरमध्ये पाणीपुरवठ्याची समस्या पुन्हा एकदा गंभीर बनली असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वेण्णा लेक येथील पंपिंग स्टेशनवरील मोटार बिघाडामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी अनेक भागांतील नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः वणवण भटकण्याची वेळ आली असून मध्यरात्रीच्या वेळेत पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेने दिलेल्या माहितीनुसार, वेण्णा लेक येथील पंपिंग स्टेशनवरील एक मोटार कालच नादुरुस्त झाली होती. दुरुस्ती करून ती आज सुरू करण्यात आली; मात्र काही वेळातच ती पुन्हा बंद पडली. त्यानंतर पर्यायी मोटार सुरू करण्यात आली असली तरी तिची पाणी उचलण्याची क्षमता कमी असल्याने शहरात कमी दाबाने आणि उशिराने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

या परिस्थितीमुळे नगरपरिषदेला रात्री उशिरापर्यंत विविध भागांमध्ये टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्याचे वेळापत्रक जाहीर करावे लागले. रांजणवाडी, ईदगा परिसर, गादळवाडी, धनगरवाडा, दुर्गामाता सोसायटी, स्कूल मोहल्ला, अंबिका व नामदेव सोसायटी येथे रात्री १० ते ११ या वेळेत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यानंतर मस्जिद रोड, शिक्षक सोसायटी, मरी पेठ, कोळी आळी आणि रामगड परिसरात रात्री ११.१५ ते १२ या वेळेत पाणी सोडले जाणार आहे. तर काही भागांना मध्यरात्रीनंतर १.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे नगरपरिषदेकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या वेळापत्रकामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दिवसभर कामधंदा करून घरी परतलेल्या नागरिकांना रात्री उशिरापर्यंत जागून पाणी भरण्याची वेळ येत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. “म्हणजे लोकांनी कामधंदा सोडून पाण्याची वाट बघायची का?” असा संतप्त सवाल अनेक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि नोकरदार वर्गाला या परिस्थितीचा मोठा फटका बसत असल्याचे सांगितले जात आहे.

महाबळेश्वरसारख्या जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळी वारंवार उद्भवणाऱ्या पाणीपुरवठा समस्येमुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरवर्षी पर्यटन हंगामात पाणीटंचाई, मोटार बिघाड, कमी दाबाने होणारा पुरवठा आणि अनियमित वेळापत्रक यामुळे नागरिकांचे हाल होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

नगरपरिषदेकडून उद्या सकाळपासून नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले असले तरी मोटार बिघाडाच्या या घटनेमुळे शहराच्या पाणीपुरवठा यंत्रणेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी सक्षम व पर्यायी यंत्रणा उभारण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl